'तुम्ही मला चुकीचं ठरवलं'; अहमद कादरी मोदींना स्पष्टच बोलले, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:54 PM2023-04-05T22:54:08+5:302023-04-05T22:55:40+5:30
व्हायरल व्हिडिओत शाह कादरी हे मोदींचे आभार मानताना दिसत आहेत.
नवी दिल्ली - शाह रशीद अहमद कादरी यांना आज पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले. राजधानी दिल्लीतील राजभवनात हा सोहळा मोठ्या-उत्साहात आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कादरी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच पद्म पुरस्कारप्राप्त महान व्यक्तींची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी, एकामागोमागे एक सर्वांचं अभिनंदन करत असताना पंतप्रधान मोदी हे शाहर रशीद अहमदत कादरी यांच्यापर्यंत पोहोचले. यावेळी, दोघांमध्ये झालेला संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओत शाह कादरी हे मोदींचे आभार मानताना दिसत आहेत. तसेच, मला काँग्रेसचं सरकार असताना पद्म पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. भाजपचं सरकार आल्यानंतर मी अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र, तुम्ही मला चुकीचं ठरवलंत, असे कादरी यांनी म्हटले. त्यावेळी, मोदींनी हसत हसत, त्यांच्या हातावर टाळी दिली. तसेच, कादरी यांचे अभिनंदन करत ते पुढे निघून गेले.
#WATCH | Padma Shri awardee Shah Rasheed Ahmed Quadari thanked PM Modi after he received the award today
— ANI (@ANI) April 5, 2023
"During Congress rule, I didn't get it (Padma Shri). I thought BJP govt will not give it to me but you proved me wrong, " says Shah Rasheed Ahmed Quadari pic.twitter.com/BKQGMKc10R
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १०६ जणांना यंदा प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. आज बुधवारी ५३ पुरस्कार विजेत्यांना राजभवनात सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये, तीन पद्मविभूषण, ५ पद्मभूषण आणि ४५ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी इतर प्रतिष्ठीत लोकांना २२ मार्च रोजी पुरस्कार देण्यात आले होते.
दरम्यान, आजच्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये शाह रशीद अहमद कादरी यांचाही सन्मान होता. शाह कादरी यांनी ५०० वर्षे जुनी बिदरी कला जिवंत ठेवली आहे. त्यांना कर्नाटकचे शिल्पगुरू म्हणून संबोधले जाते. बीदरी एक लोककला असून शाह कादरी हे अनेक वर्षांपासून बीदरी कलेची भांडे बनवत आहेत.