आप सरकार अपयशी ठरविण्याचा डाव -केजरीवाल
By admin | Published: May 18, 2015 02:46 AM2015-05-18T02:46:51+5:302015-05-18T02:46:51+5:30
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात खुले युद्ध छेडले असतानाच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी या मुद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. आमचे सरकार अपयशी ठरावे, यासाठी सर्व प्रकारचे डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीच्या बुरांडी येथे एका सभेत केजरीवाल बोलत होते. सरकारची मनाई धुडकावून ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलीन यांनी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केजरीवाल या मुद्यावर उघडपणे समोर आले. आम्ही गामलीन यांच्या नियुक्तीला विरोध केला; मात्र आमचा विरोध डावलून गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मोदी सरकारच्या हेतूंबाबत संशय निर्माण करणारी आहे; पण मी गामलीन यांच्यावर नजर ठेवेल.
आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा गामलीन एका पत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी आमच्या ऊर्जामंत्र्यांकडे आल्या होत्या. रिलायन्स मालकीच्या वीज कंपन्यांनी ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला आहे, असे त्यांनी आमच्या मंत्र्यांना सांगितले होते. संबंधित पत्रावर स्वाक्षरी करा. ही केवळ औपचारिकता आहे, असे त्या म्हणाल्या होत्या; पण जेव्हा आमच्या ऊर्जामंत्र्यांनी या पत्राची शहानिशा केली तेव्हा ते हमीपत्र निघाले. रिलायन्सच्या मालकीच्या कंपन्या कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्या असत्या तर तो भुर्दंड दिल्लीच्या जनतेवर पडला असता आणि दिल्लीतील वीजदर दुप्पट-तिप्पट महागले असते, असा दावाही केजरीवाल यांनी केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)