तुम्हाला ताजमहालाची काळजी वाटत नसावी! सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 03:06 PM2018-05-01T15:06:13+5:302018-05-01T15:06:13+5:30
खंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले.
नवी दिल्ली- संपूर्ण जगातील पर्यटक ज्या ताजमहालला भेट देण्यासाठी आग्र्याला येतात. त्या ताजमहालाचा रंग पिवळसर झाला होता आता तो तपकिरी आणि हिरवट होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली.
या ऐतिहासिक अमूल्य ठेव्याचे जतन करण्यासाठी देशातील आणि परदेशातील तज्ज्ञांची मदत घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले.
न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि एम. बी. लोकूर यांच्या खंडपिठाने याबाबत निरीक्षण नोंदवताना सांगितले, '' तुमच्याकडे यासंदर्भातील तज्ज्ञ आहेत की नाही हे आम्हाला माहिती नाही. जर तुमच्याकडे तज्ज्ञ मंडळी असतील तर तुम्ही त्यांचा वापर करत नसावेत, किंवा तुम्हाला त्याची काळजी वाटत नसावी. तुम्ही देशातील किंवा देशाबाहेरील तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे''
खंडपीठासमोर याचिकाकर्ते एम. सी मेहता यांनी दिलेले ताजमहालाचे फोटो सादर करण्यात आले त्यानंतर न्यायाधीशांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एएनएस नाडकर्णी यांना पुर्वी ताजमहाल पिवळा दिसत होता आता तो तपकिरी आणि हिरवा दिसू लागल्याचे निरीक्षण सांगितले. यानंतर 9 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
ताजमहालच्या आसपाच्या परिसरात झालेली वृक्षतोड आणि प्रदुषणामुळे ताजमहालाच्या रंगावर परिणाम होत असल्याचे पर्यावरणअभ्यासक मेहता यांनी याचिकेतून न्यायालयासमोर आणले.