एवढं जमवा अन् मोदींचं भाषण ऐकवाच!
By admin | Published: September 1, 2014 04:02 AM2014-09-01T04:02:56+5:302014-09-01T04:02:56+5:30
पंतप्रधान नरेंद मोदी शिक्षक दिनानिमित्त देशभरातील शालेय विद्यार्थ्यांशी एकाच वेळी संवाद साधणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी शिक्षक दिनानिमित्त देशभरातील शालेय विद्यार्थ्यांशी एकाच वेळी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांनी शालेय विद्यार्थ्यांना अशा प्रकारे संबोधित करण्याचा हा पहिलाच प्रयोग असून, त्यावर नाराजी आणि स्वागत अशी संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. त्यातही नाराजीचा सूर तीव्र असल्याचे जाणवू लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षकदिनानिमित्त दूरदर्शन, रेडिओ आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांचे भाषण आणि विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरे याचे थेट प्रक्षेपण ५ सप्टेंबरला दुपारी ३ ते ४.४५ या वेळेत होणार आहे. मोदींच्या या उपक्रमासाठी टीव्ही, इंटरनेट आदींची व्यवस्था करण्याची आणि सर्व विद्यार्थ्यांना दुपारी अडीच वाजल्यापासून शाळेत आणून बसविण्याची जबाबदारी शिक्षकदिनीच लादल्याने खासगी आणि सरकारी शाळांमधील अनेक शिक्षक तसेच संस्था हिरमुसल्या आहेत.
एकाच वेळी देशातील तब्बल एक कोटी चार लाख प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशी दूरदर्शन, इंटरनेट, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व रेडिओद्वारे संवाद साधणार असल्याचे आदेश संबंधितांपर्यंत पोचले आहेत. या कार्यक्र मामध्ये सर्व शाळांनी सहभागी होणे बंधनकारक असल्याचे केंद्र शासनाने व्हिडीआ कॉन्फरन्समध्ये निर्देश दिलेले आहेत.
शिक्षकदिनी पंतप्रधानांचे भाषण दूरचित्रवाणीवर प्रसारित होणार असल्याने शाळेतील टीव्ही संचासमोर विद्यार्थी बसण्याची व्यवस्था करावी. शाळेमध्ये टीव्ही संच नसेल तर शाळा मुख्याध्यापक किंवा व्यवस्थापक समितीचा टीव्ही संच शाळेमध्ये उसनवारीने घेऊन यावा. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये अधिक टीव्ही संच बसविण्यात यावेत. कार्यक्र माचे प्रक्षेपण इंटरनेटद्वारेसुद्धा होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाची आयसीटी योजना राबविण्यात आलेल्या शाळांमध्ये पुरविण्यात आलेल्या प्रोजेक्टर्सचा वापर करावा़ कार्यक्रमाच्या वेळेत वीजपुरवठा सुरू राहील याची दक्षता घेण्यात यावी. यादरम्यान भारनियमन असल्यास जनरेटरची व्यवस्था शाळा व्यवस्थापन समित्यांनी करावी. हा कार्यक्र म पार पाडण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची तसेच शाळा व्यवस्थापन समितीची राहील, असे राज्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे. या कार्यक्रमात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देशात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)