‘खूप बेसूर गातोस, बंद कर’; पोलिसांनी टाकले तुरुंगात; सोशल मीडिया स्टारला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:15 AM2022-08-07T07:15:10+5:302022-08-07T07:15:16+5:30
माफीनाम्यावर स्वाक्षरीही घेतली
नवी दिल्ली : बांगलादेशमधील एक घटना सध्या सोशल मीडियात बरीच चर्चेत आहे. इथे पोलिसांनी एका व्यक्तीला चक्क खूप बेसूर गाणं गातो म्हणून ताब्यात घेतले आणि तुरुंगात टाकले. हिरो अलोम (३७ वर्षे) असे त्याचे नाव आहे. फेसबुकवर अलोमला सुमारे २० लाख लोक फॉलो करतात. तसेच, यूट्युबवर त्याचे १४ लाखांहून अधिक सब्स्क्राइबर्स आहेत.
गायक, अभिनेता आणि मॉडेल म्हणून तो बांगलादेशच्यासोशल मीडियात ओळखला जातो, त्याचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र, या गाण्यांमुळेच त्याला अडचणींचा सामना करावा लागला. पोलिसांनी त्याला पुन्हा शास्त्रीय गाणे न गाण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
शास्त्रीय गाणी गाण्यास मनाई-
स्वतः हीरो अलोमने वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. ‘पोलिसांनी मला सकाळी ६ वाजता उचलले आणि ८ तास ताब्यात ठेवले. मी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर आणि बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांची गाणी का गातो?’ असे त्यांनी मला विचारल्याचे अलोमने सांगितले. पोलिसांनी मानसिक छळ केला. यासोबतच पुन्हा शास्त्रीय गाणी गाण्यासही मनाई करण्यात आली. याशिवाय माफीनाम्यावर स्वाक्षरीही करायला लावली, असे अलोम म्हणाला.
अशी गाणी न गाण्याचं पोलिसांना आश्वासन -
“आमच्याकडे अलोमविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याने पारंपरिक गाण्यांची शैली पूर्णपणे बदलून टाकली आहे. याशिवाय त्याने व्हिडीओमध्ये परवानगीशिवाय पोलिसांचा गणवेशही परिधान केला होता. अलोमने माफी मागितली आहे, तसेच पुन्हा अशी गाणी गाणार नाही असे आश्वासन दिले आहे,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.