आपमध्ये धुमश्चक्री; आज होणार फैसला
By Admin | Published: March 28, 2015 12:06 AM2015-03-28T00:06:58+5:302015-03-28T00:06:58+5:30
केजरीवालांनी अंतर्गत लोकशाहीला तिलांजली देत सत्ता हस्तगत करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचे भवितव्य ठरविण्यासाठी शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असतानाच या दोघांनी शुक्रवारी एका पत्रपरिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ले करीत पक्षांतर्गत संघर्ष नव्या वळणावर नेऊन ठेवला आहे. केजरीवालांनी अंतर्गत लोकशाहीला तिलांजली देत सत्ता हस्तगत करण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
केजरीवाल गटाचा आरोप
दिल्ली निवडणुकीत पक्षाचा पराभव व्हावा हाच उद्देश ठेवून भूषण व यादव यांनी कारवाया केल्या. आपमधून बाहेर पडलेल्या एव्हीएएम या गटाशी त्यांनी संबंध ठेवून २ कोटी रुपयांची बनावट देणगी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, याकडे केजरीवाल गटाने लक्ष वेधले.
राजीनामा दिलाच नाही?
आम्ही पाच मागण्या पूर्ण करण्याबाबत पाठविलेले पत्र हेच आमचे राजीनामापत्र समजले जावे असे स्पष्ट केले होते. सध्या हेच पत्र राजीनामा म्हणून दाखविले जात आहे, असा दावा भूषण व यादव यांनी केला.
तुमच्यासोबत काम करण्याऐवजी मी दिल्लीत ६७ आमदारांना घेऊन प्रादेशिक पक्षाची स्थापना करेन, असे केजरीवाल म्हणाले होते. ही कल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली? असा सवालही भूषण यांनी केला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
दीर्घकाळ पक्ष चालवताना मी केजरीवालांच्या दोन कमतरता स्पष्ट केल्या होत्या. केजरीवालांचा निर्णय अंतिम असतो. वेगळा सूर लावणाऱ्यांसोबत ते काम करू शकत नाहीत, असे सांगताना भूषण यांनी इंदिरा गांधी यांच्या सरकारने लादलेली आणीबाणी आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्यात झालेल्या दंगली ही दोन उदाहरणे दिली. यादव यांनी पक्षाला मिळालेल्या दोन कोटींच्या देणग्या आणि दिल्ली निवडणुकीच्या काळात एका उमेदवाराच्या गोदामात सापडलेल्या दारूच्या साठ्याबाबत अंतर्गत लोकपालांकडून चौकशीची मागणीही केली.
आमची तत्त्वाची लढाई
आम्ही एखादा प्रश्न उपस्थित केल्यास आमच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. आमची लढाई पक्षाची मूलभूत तत्त्वे कायम ठेवण्यासाठी आहे. पक्षाची घटना आपच्या वेबसाईटवरून काढली आहे.- योगेंद्र यादव
केजरीवालांनी गेल्या वर्षी दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आमदारांची शिकार करण्याचा प्रयत्न केला. कार्यकारिणीचा यास विरोध असतानाही केजरीवालांनी नायब राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभा विसर्जित न करण्याची विनंती केली होती.- प्रशांत भूषण
चर्चा रुळावर असताना अचानक काहीतरी घडले. त्यांनी यापुढे चर्चा सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले. त्यांनी काय घडले ते देशाला सांगायलाच हवे-आशिष खेतान