आपला आयुर्विमा झाला ६१ वर्षांचा, देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 02:31 AM2017-09-03T02:31:21+5:302017-09-03T02:31:52+5:30
‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणा-या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली असून, या काळात इन्शुरन्स व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत.
मुंबई : ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे घोषवाक्य असणा-या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एलआयसी) १ सप्टेंबर रोजी ६१ वर्षे पूर्ण केली असून, या काळात इन्शुरन्स व्यवसायामध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. त्यामुळे उदारीकरणानंतर अनेक कंपन्या या क्षेत्रात आल्या असल्या तरी लोकांचा इन्शुरन्स म्हणताच आठवण होते एलआयसीची. एवढेच नव्हे, तर आता इतक्या इन्शुरन्स कंपन्यांचे पर्याय लोकांसमोर असले तरी एलआयसी हीच लोकांची पहिली पसंती असते.
एलआयसीने २०१६-१७ च्या पहिल्या तिमाहीमध्ये आधारस्तंभ, आधारशिला, जीवन उमंग आणि प्रधानमंत्री व्यय वंदना या योजना आणल्या असून, आतापर्यंतच्या त्यांच्या योजनांची संख्या २३ आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि पेन्शन, आजार यासाठीच्याही एलआयसीच्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत.
त्यामुळे १९५६ साली अवघ्या ५ कोटी भांडवलावर उभ्या राहिलेल्या एलआयसीची मालमत्ता २५ लाख कोटी रुपयांची असून, त्यात उतरविलेल्या आयुर्विम्याची रक्कम २३ लाख २३ हजार ८०२ कोटी रुपये इतकी आहे. एलआयसीने २0१६-१७ या वर्षात २१५.५८ लाख क्लेम सेटल केले. त्यातील रक्कमच मुळी १ लाख १२ हजार ७०० कोटी रुपये आहे. आता पैशांचा भरणा करण्यासाठी एलआयसीचे अॅपही आले आहे. डेबिट व क्रेडिट कार्डाच्या आधारे त्यामुळे भरणा शक्य झाले आहे.
१४ देशांमध्ये एलआयसी
एलआयसीने आता संबंधित देशातील कंपन्यांच्या भागीदारीतून १४ देशांत पाय रोवले आहेत. नेपाळ, श्रीलंका, सिंगापूर, बांगलादेश, बहारीन, मॉरिशस, कतार, कुवेत, ओमान, फिजी आदी ठिकाणी आज एलआयसी आहे. आतापर्यंत या कंपनीने अनेक पुरस्कार व पारितोषिकेही मिळवली आहेत.