"तरुण आत्महत्या करतोय", Facebook च्या आयर्लंडच्या ऑफिसमधून थेट दिल्लीत फोन, तरुणाचा जीव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 09:57 AM2021-09-11T09:57:53+5:302021-09-11T09:58:51+5:30
देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे आणि यात फेसबुकचंही मोलाचं योगदान मिळालं आहे.
नवी दिल्ली-
देशाची राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका तरुणाचा जीव वाचला आहे आणि यात फेसबुकचंही मोलाचं योगदान मिळालं आहे. संबंधित तरण सिग्नेचर ब्रिजजवळ आत्महत्या करण्यासाठी जात होता. त्याचवेळी फेसबुक ऑफिसमधून दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन आला आणि तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेनं तरुणाला आत्महत्या करण्यापासून रोखलं आहे.
जगभरात १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या दिन म्हणून साजरा केला जातो. दिल्ली पोलीस सायबर सेलचे डीसीपी अनयेश राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला अचानक आयर्लंडमधील फेसबुकच्या कार्यालयातून फोन आला. दिल्लीत एक तरुण आत्महत्या करायला जातोय. त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरुन तशी अॅक्टीव्हीटी समोर आली आहे.
फेसबुकचा फोन पोलिसांनी गांभीर्यानं घेत संबंधित तरुणाचे लोकेशन ट्रेस केले तर तो सिग्नेचर ब्रिजजवळ असल्याचं आढळून आलं. तरुणाचे लोकेशनचा पत्ता लागल्यानंतर पोलिसांना तात्काळ संबंधित वायरलेस पोलिसांच्या कानावर माहिती टाकली आणि अलर्ट करण्यात आलं. पोलिसांनी यासाठी संबधित तरुणाच्या भावाचीही मदत घेतली आणि त्याला फोन करायला सांगून बोलण्यात व्यग्र ठेवलं. त्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. अशापद्धतीनं फेसबुक आणि पोलिसांमुळे एका तरुणाचा जीव वाचू शकला. तरुणाचं तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात आलं आणि कुटुंबीयांकडे सोपविण्यात आलं आहे.