‘स्टार्टअप महाकुंभ’ : तरुणच देत आहेत नोकऱ्या! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 07:34 AM2024-03-21T07:34:55+5:302024-03-21T07:35:04+5:30
ही नवीन संस्कृती विकसित भारतच नव्हे तर जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
नवी दिल्ली : भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप्सचा बाजार आहे. देशातील तरुण याचे नेतृत्व करीत आहेत. स्टार्टअपचे नेतृत्व ४५ टक्क्यांपेक्षा अधिक महिला करीत आहेत. देशातील तरुण आता नोकरी मागण्याऐवजी नोकरी देणारा बनला आहे.
ही नवीन संस्कृती विकसित भारतच नव्हे तर जगाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. भारत मंडपममध्ये आयोजित ‘स्टार्टअप महाकुंभ’मध्ये ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, एआय, सेमिकंडक्टर आणि क्वांटम यासाठी सुरू केलेले तीन मिशन तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी देणार आहेत.
जगभरातील गुंतवणूकदारांना यामुळे गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीम केवळ मोठ्या मेट्रो शहरांमध्ये नाही तर स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व लहान शहरांमधील तरुण करीत आहेत.
भारतासाठी ही मोठी संधी
एआयमध्ये भारताचे पारडे जड आहे, हे जगाने मान्य केले आहे. ही संधी गमावू नये यासाठी एआयला प्राधान्य द्यावेच लागणार आहे. मला विश्वास आहे की, भारतीय तरुणांच्या संकल्पना अनेक देशांच्या समस्या सोडवू शकतील, असेही पंतप्रधान म्हणाले.
२००० स्टार्टअप्स, १० देशांचे ३००० प्रतिनिधी
भारत मंडपममध्ये भरलेला ‘स्टार्टअप महाकुंभ’ हा देशातील आजवरचा सर्वात मोठा व अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.
देशभरातील २०००हून अधिक स्टार्टअप, १००० पेक्षा अधिक गुंतवणूकदार, १०० हून अधिक यूनिकॉर्न व ३०० पेक्षा अधिक इनक्युबेटर्स सामील झाले आहेत.
दहापेक्षा अधिक देशांच्या ३००० हजारांहून अधिक प्रतिनिधींना यात सहभाग घेतला आहे. ५० हजारपेक्षा अधिक व्यावसायिकांना याला भेट दिली आहे.
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक (नाबार्ड), स्मॉल इंडस्ट्रीड डेव्हलपमेंट बँक (सिडबी), एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इसीजीसी) यांच्या पुढाकारातून याचे आयोजन केले आहे.
देशात १.२५ लाख स्टार्टअप्स
२०१४ मध्ये देशात १०० स्टार्टअप्सही नव्हते. आज ही संख्या १.२५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. जवळपास १२ लाख तरुण स्टार्टअप्सशी थेट जोडले गेलेले आहेत. आमच्याकडे ११० पेक्षा अधिक यूनिकॉर्न आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
मी सुद्धा घेताे एआयची मदत
मी स्वत: एआयची खूप मदत घेतो. निवडणूक प्रचारात प्रादेशिक भाषांमुळे अनेकदा अडचण येते. अशावेळी मी एआयच्या मदतीने माझे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवतो. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान