तरुणांनो, सरकारी नोकऱ्यांमागे धावू नका; पान टपरी सुरू करा- बिप्लब देव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 01:44 PM2018-04-29T13:44:24+5:302018-04-29T16:29:42+5:30
अजब विधानांची मालिका सुरूच
त्रिपुरा: महाभारतातील इंटरनेट, डायना हेडन यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांनी तरुणांना अजब सल्ला दिलाय. सरकारी नोकऱ्यांच्या मागे लागण्यापेक्षा पान टपरी सुरू करा, असं अजब विधान देव यांनी केलंय. 'सरकारी नोकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे राजकीय पक्षांच्या मागे फिरुन वेळ वाया घालवण्यापेक्षा तरुणांनी पान टपरी सुरू करावी,' असं देब म्हणाले.
तरुणांनी स्वत:चा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करावा, असं देब यांनी सांगितलं. 'तरुणांनी स्वयंरोजगार मिळवावा. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मुद्रा योजनेतून कर्ज घ्यावं. पान टपरी सुरू करण्यासोबतच पशुपालन क्षेत्रातही तरुणांना व्यवसायाची संधी आहे. दुग्धोत्पादन क्षेत्रातही तरुणांना चांगला वाव आहे,' असं देब म्हणाले. त्रिपुरा पशुवैद्यकीय परिषदेनं आयोजित केलेल्या एका शिबिरात ते बोलत होते. 'कोणत्याही तरुणानं बँकेकडून किमान 75 हजार रुपयांचं कर्ज घेतलं, तरी तो महिन्याला किमान 25 हजार रुपये कमावू शकतो,' असंही देब यांनी म्हटलं.
तरुण त्यांच्या संकुचित मानसिकतेमुळे व्यवसायाकडे वळत नाहीत, असंही देब म्हणाले. यासाठी त्यांनी त्रिपुरात 25 वर्षे सत्तेत असलेल्या माकपला जबाबदार धरलं. 'पदवीधर तरुण शेतीकडे वळू शकत नाहीत. त्यांनी कुक्कुटपालन करु नये, अशा संकुचित विचारांमुळेच बेरोजगारी वाढली,' असंही देब यांनी म्हटलं. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारी महिन्यात दिलेल्या मुलाखतीत रोजगाराबद्दल अजब विधान केलं होतं. या मुलाखतीत मोदींना देशातील रोजगार निर्मितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, 'एखादी व्यक्ती रस्त्यावर पकोडे विकत असेल, तर त्याला रोजगार म्हणणार नाही का?,' असा प्रतिप्रश्न मोदींनी केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी सत्तेवर आल्यानंतर 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं.