तरुणाईला हवे उमदे, तडफदार नेतृत्व फोटो आहे

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:36+5:302017-01-23T20:13:36+5:30

- राज्यात 44 टक्के युवा मतदार : विद्यार्थ्यांच्या समस्यांवर विधानसभेत चर्चा व्हावी

Young people have a big, bold, bold photo | तरुणाईला हवे उमदे, तडफदार नेतृत्व फोटो आहे

तरुणाईला हवे उमदे, तडफदार नेतृत्व फोटो आहे

Next
-
ाज्यात 44 टक्के युवा मतदार : विद्यार्थ्यांच्या समस्यांवर विधानसभेत चर्चा व्हावी
पणजी : येत्या निवडणुकीत तरुण मतदारही महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गोव्यात यंदा 44 टक्के युवा मतदार असून विधानसभा निवडणुकीत तरुण मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेली काही वर्षे तरुणवर्ग मोठय़ा संख्येने निवडणुकीविषयी सजग होऊन आपला लोकशाहीतील सर्वांत मोठा हक्क बजावण्यासाठी सज्ज होत आहे. रोजगार हा सर्वांत मोठा प्रश्न युवकांसमोर आ वासून उभा असून येत्या सरकारकडून रोजगार निर्मिती व्हावी, अशी युवावर्गाची अपेक्षा आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवला जावा, अशीही विद्यार्थी वर्गाची मागणी आहे. येत्या विधानसभा निवडणुकीबद्दल आणि नव्या सरकारविषयी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेली काही मते..

कोट
आश्वासनांची पूर्तता करावी
यंदा तरुण मतदारांची संख्या मोठी असून तरुणांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा. आळस झटकून मतदान करावे. गेल्या 5-10 वर्षांत तरुण मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडू लागले असून तरुण त्यांचा अधिकार हक्काने बजावत आहेत. त्यामुळे सत्ताबदल घडवून आणण्यात तरुणांचा मोठा वाटा आहे. 5 वर्षांतून एकदाच मतदारांची दखल घेतली जाते. नंतर त्यांची कोणच विचारपूस करत नाही. त्यामुळे तरुणांनी सामाजिक भान असलेला नेता निवडावा. नेते जी आश्वासने देतात, त्यांनी त्यांची पूर्तता करावी. तसेच तरुणांकडेही लक्ष देऊन बेरोजगारीचा प्रश्न संपवावा. काही राजकीय पक्ष तरुणांचा प्रचारासाठी वापर करतात; पण नंतर त्यांची विचारपूसही करत नाहीत. नवीन सरकारने खासगी व सरकारी नोकर्‍या उपलब्ध करण्याकडे लक्ष द्यावे. तसेच नवीन उद्योग सुरू करण्यासही प्रोत्साहन द्यावे.
- अक्षय मडकईकर, अध्यक्ष, व्हॉईस ऑफ स्टुडंट्स, व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय, मिरामार

विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्या
येत्या निवडणुकीत मी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. लोकशाहीमध्ये आपला नेता निवडण्याची ही चांगली संधी आहे. संविधानातील महत्त्वपूर्ण हक्क बजावण्यासाठी फार उत्सुक आहे. तरुणांनी येत्या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करावे. जो उमेदवार खर्‍या अर्थाने समाजाची सेवा करण्यास इच्छुक आहे, अशाच उमेदवाराला निवडून द्यावे. विकासकामे करतानाच नवीन सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
- प्राजक्ता नाईक, विद्यार्थिनी, डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालय, फातोर्डा

वसतिगृहाचे शुल्क कमी करा
गोव्यात दरवर्षी हजारो तरुण पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मात्र, अनेक वर्षे या उच्चशिक्षित तरुणांना रोजगार देण्यासाठी काहीच केले जात नाही. त्यामुळे युवकांचा भ्रमनिरास होतो. प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली जातात. मात्र, त्यांची पूर्तता होत नाही. अशा वेळी खासगी किंवा सरकारी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करण्यासाठी नवीन सरकारने पाऊल उचलले पाहिजे. गोवा विद्यापीठामध्ये लांबून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे. मात्र, शुल्क भरमसाट असल्याने अनेक विद्यार्थ्यांंची ते भरण्याची क्षमता नाही. हा विषय विधानसभेत मांडणे आवश्यक आहे. नवीन सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा.
- संकल्प महाले, अध्यक्ष, पदव्युत्तर विद्यार्थी मंडळ, गोवा विद्यापीठ

आमिषांपासून दूर राहा
गोव्यातील राजकीय क्षेत्राचे स्वरूप बदलण्याची ताकद आजच्या युवकांमध्ये आहे. जे नेते खोटी आश्वासने देऊन आपला राजकीय स्वार्थ पूर्ण करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतात, अशांपासून युवकांनी चार हात लांब राहिले पाहिजे. युवकांनी आमिषांकडे आकर्षित न होता योग्य उमेदवारालाच निवडून आणले पाहिजे. तरुण हेच राज्य आणि देशाचे भविष्य असून तरुणांसाठी लाभदायक अशा योजना नव्या सरकारने राबविल्या पाहिजेत.
- निमिष परब, सरचिटणीस, विद्यार्थी मंडळ, धेंपे महाविद्यालय

भ्रष्ट उमेदवारांना टाळा
थोड्याच दिवसांत निवडणूक होणार असून मतदानाचा हक्क बजावून हवा असलेला आमदार किंवा सरकार निवडून आणण्याची मोठी संधी युवावर्गाला आहे. दारू पिऊन किंवा आमिषाला बळी पडून उमेदवार निवडणे योग्य नाही. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी उमेदवाराला जाणून घेणे गरजेचे आहे. फसवणूक वा दादागिरी करणार्‍या उमेदवाराला निवडून आणण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने विचार केला पाहिजे. आज केलेला विकास पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडतो. भ्रष्टाचाराला आळा घालणार्‍या उमेदवाराला प्राधान्य द्या. एकाच दिवशी केलेले मतदान आमच्या 5 वर्षांंचे भविष्य ठरवते, हे सर्वांंनी लक्षात ठेवले पाहिजे.
- शरत रायकर, विद्यार्थी, गोवा विद्यापीठ

योग्य उमेदवार निवडा
युवक हेच देशाचे भविष्य आहेत. यंदा अनेक उमेदवारांचे युवकांच्या मतदानाकडे लक्ष लागून राहिले आहे. युवकांना भूलथापा, खोटी आश्वासने देण्याचेही प्रकार सर्रास घडत आहेत. तसेच अनेक पक्ष स्वार्थापोटी तरुण कार्यकर्त्यांंचा प्रचारासाठी वापर करतात. मात्र, निवडणुका झाल्या की या कार्यकर्त्यांंकडे राजकीय पक्ष पाठ फिरवतात. अशा वेळी युवकांनी भूलथापांना बळी न पडता योग्य तोच उमेदवार निवडून द्यावा. सरकारे सत्तेवर येतात आणि जातात. मात्र, विद्यार्थ्यांंच्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष देत नाही. अशा लोकांना घरी पाठवून जे तरुणांच्या समस्या सोडविण्यावर भर देतात, त्यांनाच निवडून आणावे.
- आशीष नाईक, विद्यार्थी, आग्नेल पॉलिटेक्निक महाविद्यालय, वेर्णा

खरे तर महिलांचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी महिला उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. तसेच युवकांचे प्रतिनिधित्व करणारे तरुण उमेदवारही विधानसभेत पाठवले पाहिजेत. संधिसाधू उमेदवारांना यंदा घरचा रस्ता दाखवा. उमेदवार जेव्हा दारात प्रचारासाठी येतात, तेव्हा तरुणांना अनेक आश्वासने देतात. मात्र, प्रत्यक्षात विधानसभेत गेल्यावर या आश्वासनांकडे पाठ फिरवली जाते. मात्र, अशा उमेदवारांना ओळखून मतदान करावे. तसेच धर्म, जातींच्या नावाने लोकांमध्ये भेदभाव केला जातो. अशा जातीयवादी उमेदवारांपासून चार हात लांब राहावे. आपला प्रतिनिधी कसा आहे, हे जाणण्याचा प्रत्येकाला अधिकार असून प्रतिनिधीला भेटून त्यांच्याशी चर्चा करूनच युवकांनी निर्णय घ्यावा.
- प्रज्ञा तारी, विद्यार्थिनी, गोवा विद्यापीठ

यंदाच्या निवडणुकीत राज्यातील 44 टक्के युवा मतदार मतदान करणार असून युवकांची संख्या फार मोठी आहे. अशा वेळी युवकांच्या समस्या युवकच चांगल्या रितीने समजू शकतात. युवा मतदारांनी त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सामाजिक भान असलेल्या तडफदार उमेदवारांना विधानसभेत पाठवले पाहिजे. जे उमेदवार अनेक वर्षे निवडणूक लढवून केवळ पैशांच्या ताकदीवर जिंकून येतात, त्यांना घरीच बसवायला हवे. मतदारराजा जागृत हो.
- रिद्धी नायक, विद्यार्थिनी, रामनाथ कृष्णा पै रायकर स्कूल ऑफ अँग्रिकल्चर, सावईवेरे

Web Title: Young people have a big, bold, bold photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.