तरुण मतदारांना हवे केजरीवालांसारखे नेतृत्व
By admin | Published: April 3, 2016 03:52 AM2016-04-03T03:52:23+5:302016-04-03T03:52:23+5:30
आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे
तेलपूर (आसाम) : आसाममधील तरुण मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत चांगल्या बदलाची अपेक्षा करीत असून आपल्या राज्यासाठी त्यांना सर्वंकष विकास आणि सर्व धर्मांच्या कल्याणासाठी काम करणारे शेजारील त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारखे नेतृत्व हवे आहे.
राज्यातील युवा मतदार आणि प्रामुख्याने प्रथमच मतदानाचा अधिकार बजावण्यास आतुर असलेल्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तेजपूर विद्यापीठात शिकणारी उद्दीपना गोस्वामी म्हणाली, आम्हाला बदल हवा आहे हे निश्चित; परंतु तो चांगला असावा. भाजप अशा बदलाचा दावा करीत असला तरी अलीकडच्या काळातील काही घटनांमुळे चिंता वाढली आहे.
आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवेश, प्रादेशिकवादावर राष्ट्रवाद थोपणे आणि सांप्रदायिक भेदभाव निर्माण होण्याच्या भीतीमुळे विद्यार्थी सतर्क झाले आहेत, असाही दावा तिने केला, तर भाजपचा प्रचार केवळ तरुण गोगोर्इंविरुद्ध असून आपल्या योजना काय आहेत हे मात्र या पक्षाने स्पष्ट केले नसल्याचे मत सुकन्या मजुमदारने मांडले.
दरांग महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या हिमांका फुकन याने सांगितले की, भाजप सत्तेत आल्यास धोका निर्माण होऊ शकतो; पण आम्ही हा धोका पत्करण्यास तयार आहोत, कारण आम्हाला बदल पाहिजे आहे.
फुकनची वर्गमैत्रीण मयुरी बोरा ही मात्र त्याच्या मताशी सहमत नाही. काँग्रेसच्या तीन वर्षांच्या शासनकाळात आसाममध्ये काहीच विकास झाला नाही असे म्हणणे चुकीचे आहे; पण बदलत्या काळासोबत लोकांना गतिमान विकास अपेक्षित आहे, असे ती म्हणाली.