आपची बेदींविरुद्ध तक्रार
By admin | Published: February 8, 2015 02:24 AM2015-02-08T02:24:05+5:302015-02-08T02:24:05+5:30
विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने कृष्णानगरस्थित विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
आयोगाला पाठविलेल्या पत्रात आपने किरण बेदी यांनी आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह दुचाकीवर रॅली काढल्याचा आरोप केला आहे. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडे प्रचाराचे साहित्य होते आणि ते मतदारांशी बोलले, असेही त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा ५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता थंडावल्या होत्या.
स्थिर सरकारची आशा
या निवडणुकीनंतर राजधानीत स्थिर सरकार स्थापन होईल, अशी आशा दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी व्यक्त केली आहे. गेल्या एक वर्षापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट आहे. निवडणुकीनंतर दिल्लीत स्थिर सरकार स्थापन होणार काय? असा प्रश्न विचारला असता मला अशी आशा आहे, असे ते म्हणाले. जंग यांनी मॉडेल टाऊन मतदार संघातील सिव्हिल लाईन्समध्ये सेंट झेव्हिअर्स सिनिअर सेंकडरी स्कूल मतदान केंद्रात मतदान केले.
राष्ट्रपतींचे मतदान नाही
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानात भाग घेतला नाही. पण राष्ट्रपती भवनातील मतदान केंद्रावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा मात्र घेतला. देशाचा राष्ट्रपती हा कुठल्याही एका राजकीय पक्षाचा नसतो. त्यामुळे आपण सार्वत्रिक अथवा विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या देखरेख पथकाने ४० लाख रुपये रोख आणि १ कोटी २६ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या ५३,००० बाटल्या जप्त केल्या. याशिवाय आयोगाच्या चमूने मतदारांना बेकायदेशीरपणे लालूच दिल्याप्रकरणी ४४ गुन्ह्यांचीही नोंद केली. पेड न्यूजचीही ६० प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.
मतदानावर बहिष्कार
४आपल्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे विकास कार्य न झाल्याने नाराज झालेल्या नरेला मतदारसंघातील झंगोला गावामध्ये बहुतांश नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला.
४अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार दुपारी १२.३० वाजेपर्यत या क्षेत्रातील एकूण नोंदणीकृत १,८०० मतदारांपैकी फक्त १९ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. नाराज मतदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.