आपचा ‘ताप’ आणखी वाढला
By Admin | Published: May 4, 2015 11:19 PM2015-05-04T23:19:37+5:302015-05-04T23:19:53+5:30
वादविवादांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आम आदमी पार्टीचा (आप) ताप आणखी वाढला आहे. आता पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने पक्षनेते कुमार विश्वास यांना आरोपीच्या
नवी दिल्ली : वादविवादांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या आम आदमी पार्टीचा (आप) ताप आणखी वाढला आहे. आता पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने पक्षनेते कुमार विश्वास यांना आरोपीच्या पिंजऱ्यात खेचले आहे. कुमार यांनी त्यांच्या सोबत अनैतिक संबंधांबाबत पसरलेल्या खोट्या अफवा फेटाळल्या नसल्याने आपली प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या महिला कार्यकर्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली महिला आयोगाने विश्वास आणि त्यांच्या पत्नीला आज मंगळवारी पाचारण केले.
दरम्यान, काँग्रेस आणि भाजपने या मुद्यावरून आपविरुद्ध हल्लाबोल सुरू केला असतानाच पक्ष मात्र विश्वास यांच्या बाजूने उभा राहिला असून, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी पोलिसांवर टाकली. यावर पोलिसांनीही गुन्हा नोंदविण्यात आला असून चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना स्वतंत्र पत्राद्वारे यासंदर्भात माहिती दिली होती; परंतु दोघांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही, असा दावा या महिलेने केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तिने अमेठीत विश्वास यांच्यासाठी निवडणूक प्रचार केला होता. त्यानंतर विश्वास यांचे या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप झाला होता; परंतु विश्वास यांनी या आरोपांचे खंडन न केल्याने आपली प्रचंड बदनामी झाली असून खासगी आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, अशी व्यथा तिने मांडली आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पक्षाच्या रॅलीत शेतकऱ्याची आत्महत्या, कायदेमंत्र्यांची बनावट पदवी, पक्षांतर्गत बंडाळी यामुळे पक्ष बेजार आहे. विश्वास यापूर्वीही महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधानांमुळे अडचणीत आले आहेत. या मुद्यावरून माध्यमांवर आगपाखड करताना माध्यमे भाजपच्या हातची खेळणी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विश्वास यांच्या सांगण्यानुसार कथित महिलेने १५ दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होती; परंतु पोलिसांनी अद्याप यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे तिने कुमार यांना मेल करून आता मी काय करू, अशी विचारणा केली होती. पक्षाच्या कायदेविषयक समितीने तिला पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा सल्ला दिला होता. आयोगाची नोटीस अद्याप आपल्याला मिळाली नसून मिळाल्यानंतर आपण योग्य उत्तर देऊ, असे कुमार यांनी सांगितले.