VIDEO: तुमचं शिरकाण करून कुत्र्यांना खायला घालू; पाकिस्तानातील मौलवीची हिंदूंना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 09:58 AM2020-07-08T09:58:57+5:302020-07-08T10:01:40+5:30
मंदिराला पाठिंबा देणाऱ्यांना मौलवीची थेट धमकी; पाकिस्तानातील मंदिराचं काम थांबलं
इस्लामाबाद: अनेकांनी विरोध केल्यानं इस्लामाबादमधील हिंदू मंदिराचं बांधकाम थांबवण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या राजधानीत पहिलं मंदिर उभारण्यात येत होतं. मात्र मुस्लिम समाजातील काही कट्टरपंथियांनी विरोध केल्यानं गेल्याच आठवड्यात मंदिराचं बांधकाम थांबवण्यात आलं. मात्र आता या मंदिराला पाठिंबा देणाऱ्यांना कट्टरपंथियांकडून धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत.
इस्लामाबादमध्ये श्रीकृष्ण मंदिराचं सुरू असलेलं काम गेल्याच आठवड्यात थांबवलं गेलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षानंदेखील मंदिरावर आक्षेप नोंदवला. मंदिराची उभारणी इस्लामविरोधी असल्याचं म्हणत खान यांच्या पक्षानं मंदिर उभारणीला विरोध केला. यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मौलवी मंदिराला पाठिंबा दर्शवणाऱ्यांचं शिरकाण करण्याची धमकी देताना दिसत आहे. मंदिराजवळ तुमचा शिरच्छेद करून कुत्र्यांना खायला घालू, अशा शब्दांमध्ये मौलवीनं श्रीकृष्ण मंदिराला पाठिंबा दर्शवणाऱ्यांना थेट धमकी दिली आहे.
A Pakistani Muslim cleric speaking what Islam preach, if Hindus built Temple in Pakistan..... same will happen in India....if Hindus don't wake up to reality. pic.twitter.com/jRppfxZX1z
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) July 5, 2020
राजधानी विकास प्राधिकरणानं (सीडीए) गेल्याच आठवड्यात मंदिराचं काम थांबवलं. मंदिराच्या जमिनीशी संबंधित कायदेशीर मुद्दे उपस्थित करून हे काम थांबवलं गेलं. इमारत नियंत्रण विभागाच्या (बीसीएस) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मंदिराचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाला भेट दिली. इमारतीचा आराखडा जमा करून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पुढचं बांधकाम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
इस्लामाबादमधल्या एच-९ प्रशासकीय विभागातील २० हजार चौरस फूट जमिनीवर मंदिर उभारण्यात येणार आहे. मानवाधिकार विभागाचे संसदीय सचिव लाल चंद माल्ही यांनी मंदिरासाठी भूमिपूजन केलं होतं. मात्र सध्या तरी त्याचं बांधकाम थांबवण्यात आलं आहे. त्यातच आता मुस्लिम कट्टरपंथियांकडून मंदिराला पाठिंबा देणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत.