तुमची ओळख हॉटेल, मॉटेल पटेलवाला! परदेशी पर्यटकांना भारतात पाठवा; मोदींचे गुजरात्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 05:45 AM2018-07-07T05:45:59+5:302018-07-07T05:45:59+5:30
‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ म्हणून तुमची अमेरिकेत ओळख आहे, अशा मजेशीर अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत आयोजित सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अमेरिकेत वसलेल्या पटेल समुदायाशी संवाद साधला, तसेच त्यांना भारतीय पर्यटन क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले.
नवी दिल्ली : ‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ म्हणून तुमची अमेरिकेत ओळख आहे, अशा मजेशीर अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत आयोजित सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक संमेलनात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अमेरिकेत वसलेल्या पटेल समुदायाशी संवाद साधला, तसेच त्यांना भारतीय पर्यटन क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन केले. आपल्यापैकी प्रत्येक एक व्यक्ती किमान पाच लोकांना पर्यटनासाठी भारताला भेट देण्यासाठी उद्युक्त करू शकता का?
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ अशी तुमची अमेरिकेत ओळख आहे. मग तुमच्या हॉटेल, मॉटेलमध्ये आलेला पाहुणा टीव्हीत पाहत असेलच, तेव्हा त्या टीव्हीवर तुम्ही भारतीय पर्यटनावरील पाच मिनिटांची चित्रफीत दाखवू शकता, जेणेकरून तुमच्या हॉटेल, मॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्याला भारत काय आणि कसा आहे, हे कळेल.
कॅलिफोर्नियात आयोजित संमेलनाला मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतील हॉटेल, मॉटेल क्षेत्रातील गुजराती पटेलांच्या असलेल्या वर्चस्वाचा विनोदाने ‘हॉटेल, मॉटेल पटेलवाला’ असा गमतीने उल्लेख केला. अमेरिकेत निम्म्याहून अधिक मॉटेल्स अनिवासी भारतीयांच्या मालकीची आहेत. यापैकी ७० टक्के मॉटेल्स अनिवासी गुजराती चालवितात, अशीही आकडेवारी समोर आलेली आहे.
७० टक्के मॉटेल्स पटेलांचीच
साठच्या दशकात गुजराती पटेल समुदायाने अमेरिकेतील मॉटेल्स उद्योग क्षेत्रात पदार्पण केले, तेव्हापासून ‘पटेल-मॉटेल’ संकल्पना रूढ झाली, असे ‘स्मिथसोनियन’ या मासिकाने २०१४ मध्ये एका लेखात नमूद केले होते. अमेरिकेत कुठल्याही मॉटेलमध्ये गेल्यास तुम्हाला भारतीय-अमेरिकन परिवार दिसेलच, असेही या लेखात नमूद करण्यात आले होते.