आपच्या आमदार लांबा यांच्यावर हल्ला
By admin | Published: August 9, 2015 10:27 PM2015-08-09T22:27:18+5:302015-08-09T22:27:18+5:30
उत्तर दिल्लीच्या काश्मिरीगेट भागात शनिवारी सकाळी अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने आम आदमी पार्टीच्या (आप) आमदार अल्का लांबा यांच्यावर हल्ला केला.
नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या काश्मिरीगेट भागात शनिवारी सकाळी अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने आम आदमी पार्टीच्या (आप) आमदार अल्का लांबा यांच्यावर हल्ला केला.
लांबा यांनी सकाळी ६ वाजता अमली पदार्थविरोधी मोहीम सुरू केली आणि त्या स्थानिक लोकांना मार्गदर्शन करीत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर दगडफेक केली. डोक्याला मार बसल्याने त्यांना तातडीने अरुणा आसफअली रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर लांबा यांना सुटी देण्यात आली.
या परिसरात सक्रिय अमली पदार्थमाफियांनी हा हल्ला केल्याचा काही पक्ष कार्यकर्त्यांचा दावा आहे, तर काहींनी भाजपकडे संकेत करीत हल्लेखोर भाजप आमदार ओमप्रकाश शर्मा यांच्या मिठाईच्या दुकानाजवळ उभा होता, असे सांगितले. अल्का लांबा यांच्यावरील हल्लेखोर मिठाईच्या दुकानात काम करतो आणि या दुकानाचे मालक शर्मा आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाली असल्याचे आपचे ज्येष्ठ नेते आशुतोष यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)