आपचा लोकपाल नव्हे ‘महाजोकपाल’
By Admin | Published: November 29, 2015 03:02 AM2015-11-29T03:02:18+5:302015-11-29T03:02:18+5:30
आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि नामांकित अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी दिल्ली सरकारचा लोकपाल म्हणजे ‘महाजोकपाल’ असल्याची टीका करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि नामांकित अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी दिल्ली सरकारचा लोकपाल म्हणजे ‘महाजोकपाल’ असल्याची टीका करून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर आपनेही त्यांना प्रत्युत्तर देत भाजपसाठी काम करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला.
भूषण यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिल्ली लोकपाल विधेयक बघून आपल्याला आश्चर्य वाटल्याचे सांगितले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वातील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान जनलोकपाल विधेयकाचा जो आराखडा तयार करण्यात आला होता त्यातील अनेक तरतुदी कमकुवत करण्यात आल्या आहेत. एकाअर्थी दिल्ली लोकपाल विधेयकात जनलोकपाल विधेयकातील सर्व सिद्धांतांवर पाणी फेरण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. केजरीवाल मंत्रिमंडळाने अलीकडेच लोकपाल विधेयकाला मंजुरी दिली असून सोमवारी हे विधेयक विधानसभेच्या पटलावर मांडले जाण्याची शक्यता आहे. जनलोकपाल विधेयकाचा आराखडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे भूषण म्हणाले की, दिल्ली सरकारच्या विधेयकात लोकपाल नियुक्ती आणि हटविण्याचे सर्वाधिकार सरकारला देण्यात आले आहेत. त्यामुळे हा लोकपाल केवळ एक ‘महाजोकपाल’असेल.
केजरीवाल यांनी हा देश आणि दिल्लीच्या जनतेसोबत फार मोठा विश्वासघात केला असून त्याची तोड नाही, असा वाग्बाणही भूषण यांनी डागला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
त्यांचे वडील आणि आपचे संस्थापक शांती भूषण यांनीसुद्धा या विधेयकाचे खरे नाव ‘केजरीवाल सरकारमधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपविणारे विधेयक’ असे असले पाहिजे अशी टीका केली.
1) आपचे नेते राघव चड्डा यांनी भूषण यांचे सर्व आरोप फेटाळताना दिल्ली निवडणुकीपूर्वी भूषण कुटुंबाने जाहीरपणे आपच्या पराभवासाठी प्रयत्न केले होते असा उलटवार केला.
2) ही प्रशांत भूषण यांची नाही तर भाजपची पत्रपरिषद होती, असा टोलाही त्यांनी लगावला. चड्डा म्हणाले, भूषण यांचे अरुण जेटलींसोबतचे संबंध सर्वश्रुत आहेत. भाजप त्यांची निष्ठा पडताळत असून निकट काळात त्यांना यासाठी पुरस्कृत करण्यात आल्यास आश्चर्याचे कारण नाही.
3) आंदोलनाच्या वेळी तयार करण्यात आलेलेच हे जनलोकपाल विधेयक असल्याचा दावाही त्यांनी केला. भूषण पक्षासोबत असताना त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला होता. मग आता हा विरोध का? असा सवाल आप नेत्याने केला. आपचे आणखी एक नेते कुमार विश्वास यांनीसुद्धा भूषण यांचे आरोप नाकारले.