तुमच्याच पक्षाने तुम्हाला वाऱ्यावर सोडले ताई...; महुआ मोईत्रा यांना भाजपचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 05:39 AM2023-10-23T05:39:04+5:302023-10-23T05:40:00+5:30
तृणमूल काँग्रेसने सुरुवातीला महुआ मोईत्रांशी संबंधित वादावर भाष्य करण्यास नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपांवरून तुमच्याविरुद्ध गदारोळ सुरू असताना, पक्षाने तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिले, असा चिमटा भाजप नेते अमित मालवीय यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना काढला.
तृणमूलच्या नेत्यांना अटक होते, तेव्हा पक्षप्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मौन बाळगतात. ममता बॅनर्जींनी महुआ मोईत्रा यांना वाऱ्यावर सोडले यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अभिषेक बॅनर्जी यांना सोडून त्या अन्य कोणाचाही बचाव करणार नाहीत. तृणमूलचे अनेक नेते गंभीर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी आरोपाखाली तुरुंगात आहेत. पण, ममता बॅनर्जी यांनी त्यावर मौन पाळले आहे, असे मालवीय सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले.
तृणमूल काँग्रेसने सुरुवातीला मोईत्रांशी संबंधित वादावर भाष्य करण्यास नकार दिला. हा वाद ज्यांच्याभोवती फिरत आहे ती व्यक्ती यावर प्रतिक्रिया देण्यास योग्य आहे असे आम्हाला वाटते, असे तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले. परंतु त्यानंतर पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी पक्षाची भूमिका मांडली.
आरोप कोणते?
मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप करत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी शनिवारी त्यांच्याविरोधात लोकपालांकडे तक्रार दाखल केली. मोईत्रा यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत.
चौकशीनंतर पक्ष निर्णय घेईल : डेरेक ओब्रायन
खासदार महुआ मोइत्रा यांच्यावरील गंभीर आरोपांबाबत तृणमूल काँग्रेसने रविवारी मौन सोडले. या प्रकरणाची संसदेच्या योग्य मंचाद्वारे चौकशी केली जावी, त्यानंतर पक्ष नेतृत्व याबाबत निर्णय घेईल, असे पक्षाने म्हटले आहे. तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन म्हणाले, आम्ही प्रसारमाध्यमांतील वृत्तांचे अवलोकन केले आहे. पक्षनेतृत्वाने संबंधित सदस्याला आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. तथापि, त्यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. संसदेच्या योग्य मंचानेही चौकशी करावी, त्यानंतर पक्ष निर्णय घेईल.