काही पैशांमध्ये विकली जाते तुमची वैयक्तिक माहिती
By admin | Published: March 1, 2017 04:20 AM2017-03-01T04:20:02+5:302017-03-01T04:20:02+5:30
उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती अगदी रुपयांपेक्षा कमी किंमतीत म्हणजेज काही पैशांत विकली जाते असे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही.
बंगळुरू / नवी दिल्ली : तुमचा निवासी पत्ता, फोन नंबर, ई मेल आयडी, वय, वैवाहिक माहिती, उत्पन्न, व्यवसाय आदींची माहिती अगदी रुपयांपेक्षा कमी किंमतीत म्हणजेज काही पैशांत विकली जाते असे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे वास्तव आहे. डेटा ब्रोकर्स सर्रास ही माहिती विकत आहेत आणि तीही च्युर्इंग गमच्या दरात.
ही माहिती विकणारे डेटा ब्रोकर्स पाहिजे त्या श्रेणीतील आणि शहरातील माहिती देऊ शकतात. यातील काही डेटा ब्रोकर्सशी संपर्क साधला असता असे दिसून आले की, ही माहिती ते १० ते १५ हजार रुपयात विकत आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली येथील एक लाख व्यक्तींची माहिती या ब्रोकरला मागितली असता ही माहिती देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. विशेष म्हणजे उच्च उत्पन्न गट, के्रडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्ती, ज्यांच्याकडे स्वत: च्या कार आहेत, निवृत्त महिला अशा वर्गवारीतील माहितीही या ब्रोकरकडे आहे. काही ब्रोकर्सने तर फ्री सँपल्सही पाठविली. त्यात संबंधित व्यक्तींचे पत्ते, उत्पन्न, कार्ड (डेबिट, क्रेडिट, प्रीमियम) यांची माहिती होती. दिल्ली, एनसीआर, बंगळुरू येथील एक लाख ७० हजार नागरिकांची माहिती फक्त सात हजार रुपयांत देण्याची तयारी या ब्रोकर्सने दर्शविली.
बंगळुरूमधील नागराज बी. के. यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. माझ्या परवानगीशिवाय माझी माहिती दुसऱ्या व्यक्तीला कशी समजते? हा तर गुन्हा आहे असे ते म्हणाले. त्यांनी आॅनलाइन खरेदी केलेल्या वस्तूंची माहिती ब्रोकरने परस्पर दुसऱ्याला दिली होती. असेच अनुभव अन्य काही जणांनाही आले आहेत. एका महिलेने आॅनलाईन खरेदी केलेल्या काही वस्तूंची यादीच या ब्रोकर्सच्या हाती लागली.
यावर आॅनलाइन विक्री करणाऱ्या अॅमेझॉनचे म्हणणे आहे की, आमच्याकडून अशी कोणतीही माहिती लिक होत नाही. एचडीएफसी आणि एक्सिस बँकेने स्पष्ट केले आहे की, व्यक्तिगत माहितीबाबत आम्ही ग्राहकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. (वृत्तसंस्था)
।फसवणुकीचे प्रकार
आर्थिक व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. के्रडिट, एटीएम/डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकींगमध्ये अशा फसवणुकीचे आठ हजारहून अधिक प्रकरणे रिझर्व्ह बँकेने दाखल केली आहेत.
।200
अब्ज डॉलर्सचा धंदा
जागतिक स्तरावर डेटा ब्रोकर्सचा व्यवसाय २०० अब्ज डॉलर्सचा असल्याचे सांगितले जाते. भारतातही हा व्यवसाय वाढत चालला आहे.