'आपलं वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय...', ममतांवरील विधानावरून दिलीप घोष यांना भाजपनंच बजावली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 09:52 AM2024-03-27T09:52:08+5:302024-03-27T09:52:31+5:30
यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील वक्तव्याने भाजप नेते दिलीप घोष यांची अडचण वाढली आहे. यासंदर्भात भाजपने त्यांना नोटीस बजावली आहे. आपले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय असल्याचे म्हणत भाजपने त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून स्पष्टीकरणही मागितले आहे.
"आपण केलेले वक्तव्य अशोभनीय आणि असंसदीय आहे. हे भारतीय जनता पक्षाच्या परंपरेविरुद्ध आहे. पक्ष अशा वक्तव्यांचा निषेध करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार या संदर्भात आपण लवकरात लवकर खुलासा करून योग्य ती कार्यवाही करावी," असे भाजपने नोटीस जारी करत म्हटले आहे.
TMC ची ECI कडे तक्रार -
भाजप नेते दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. ममता बॅनर्जी स्वतःला कधी गोव्याची कन्या म्हणवतात तर कधी त्रिपुराची कन्या म्हणवतात. त्यांनी त्यांचे खरे पिता कोण आहेत हे सांगावे. कुणाचीही कन्या होणे योग्य नाही, असे दिलीप घोष यांनी म्हटले होते. यानंतर, त्यांचे हे वक्तव्य महिलांच्या अस्मितेशी जोडत टीएमसीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते घोष -
कीर्ती आझाद यांच्यासंदर्भात बोलताना दिलीप घोष ममता बॅनर्जींवर घसरले. "कीर्ती आझाद दीदींचा हात धरून आले, आता त्यांचे पाय थरथरत आहेत. आझाद यांना त्यांच्याच लोकांकडून दूर ढकलले जाईल. बंगालची जनता त्यांना कधी दूर ढकलून देईल हे त्यांनाही समजणार नाही," असे घोष म्हणाले. याचवेळी, घोष म्हणाले, "बंगालला आपला पुतण्या हवा आहे. मुख्यमंत्री गोव्यात जाऊन म्हणाल्या, मी गोव्याची कन्या आहे. त्रिपुरात म्हणाल्या, मी त्रिपुराची कन्या आहे. त्यांनी सर्वप्रथम हे निश्चित करायला हवे की, त्यांचे वडील कोण आहेत? कुणाचीही कन्या होणे योग्य नाही."