रेल्वे ट्रॅकवर तीन मित्र शूट करत होते व्हिडीओ; कॅमेऱ्यात कैद झाला LIVE मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 12:21 PM2021-10-17T12:21:26+5:302021-10-17T12:21:43+5:30
तीन मित्रांपैकी एकाचा रेल्वे अपघातात मृत्यू; संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद
हुगळी: पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तीन मित्र सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी व्हिडीओ चित्रित करत असताना अपघात घडला. तीन मित्रांपैकी एकाला रेल्वेनं धडक दिली. त्यात त्यानं जीव गमावला. मृत मुलगा १४ वर्षांचा होता. त्याचा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला.
हुगळीतील भग्रेश्वर रेल्वे स्थानकाजवळ दुर्गा पूजा सुरू होती. वातावरणात उत्साह होता. त्यावेळी सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी तीन मित्र व्हिडीओ चित्रित करत होते. धीरज पाटील (१४), दीपू मंडल (१८) आणि आकाश पांडे (१९) व्हिडीओ चित्रित करण्यात अतिशय व्यस्त होते. रेल्वेनं त्यांना हॉर्न दिला. मात्र तो त्यांना ऐकू आला नाही.
भद्रेश्वर रेल्वे स्थानकाजवळून लोकल ट्रेन जात होती. ट्रेनच्या धडकेत किशोर पाटीलचा मृत्यू झाला. या अपघातातून दीपू मंडल आणि आकाश पांडे थोडक्यात वाचले. अपघाताची माहिती मिळताच जीआरपी गोपाल गांगुलींच्या नेतृत्त्वाखालील टीमनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी किशोरचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दोन मित्रांकडे अपघाताची चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ आढळून आला. तो पाहून पोलीस चक्रावले.