अमेरिकेच्या नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ल्यात केरळमधील युवक ठार
By admin | Published: April 14, 2017 11:17 AM2017-04-14T11:17:04+5:302017-04-14T11:41:38+5:30
अफगाणिस्तानातील ननगरहार भागातील इसिसचे तळ उद्धवस्त करण्यासाठी जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - इसिसचे तळ नष्ट करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या आजवरच्या शक्तीशाली बॉम्ब हल्ल्यात केरळमधील युवक ठार झाल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. मुर्शिद असे या युवकाचे नाव असून केरळमधून बेपत्ता झालेल्या 21 युवकांपैकी तो एक आहे. केरळमधून बेपत्ता झालेले हे सर्व युवक नंतर इसिसमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले होते. टेलिग्राम मेसेजवरुन मुर्शिदच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूची बातमी कळल्याचे एएनआयने म्हटले आहे.
बेपत्ता असलेल्या याच 21 युवकांपैकी एकजण फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता. केरळ कासारागॉड येथे रहाणारे मुर्शिदचे दूरचे नातेवाईक हफीसुद्दीन थीकी कोलीथ यांना हा टेलिग्रामवरुन मेसेज मिळाला. अमेरिकेने गुरुवारी अफगाणिस्तानातील ननगरहार भागातील इसिसचे तळ उद्धवस्त करण्यासाठी जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला.
पाकिस्तानच्या सीमेजवळ ननगरहार प्रांतात अचिन जिल्ह्यात इसिसचे बोगदे आणि बंकर असलेल्या परिसरात स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास हा हल्ला केला गेला. ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अशी ओळख असणाऱ्या २१ हजार पौंड वजनाच्या या बॉम्बच्या स्फोटाने दहशतवादी जगताला हादरा तर बसलाच, शिवाय अमेरिकेने आपल्या शक्तीचे पुन्हा दर्शन घडविले. ज्या भागात ‘जीबीयू ४३ बी मॅसिव्ह ऑर्डिनेन्स एअर ब्लास्ट’ बॉम्ब टाकण्यात आला तो इसिसचा प्रभाव असलेला परिसर आहे. या हल्ल्याने किती हानी झाली ते स्पष्ट होऊ शकले नाही.