धक्कादायक! ट्रेन समोरून येत असतानाच रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर ठेवला; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 09:48 PM2019-08-12T21:48:19+5:302019-08-12T21:57:09+5:30
एका व्यक्तीनं रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर ठेवून व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
थिरुअनंतपूरमः एका व्यक्तीनं रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर ठेवून व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर रेल्वे प्रशासनाची झोप उडाली. पोलिसांनी लागलीच या प्रकरणाचा छडा लावत तिरुपतीमधल्या रामी रेड्डी या व्यक्तीला अटक केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यानं हा प्रकार केला होता. तसेच यापूर्वीही त्यांनी टायर, बाइक आणि फटाके रेल्वे रुळावर ठेवून व्हिडीओ बनवले होते. विशेष म्हणजे हा सिलिंडर रेल्वे रुळावर ठेवला असताना रेल्वे वेगानं धावत येऊन त्याला धडकत असल्याचंही त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळतं आहे.
अशा वेळी जर भरलेला सिलिंडर असता आणि त्याचा स्फोट झाला तर किती मोठी दुर्घटना घडू शकते, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. रामी रेड्डीचा हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. तसेच रेल्वे ट्रॅकवर टायर, बाइक आणि सिलिंडर ठेवल्याचे व्हिडीओही त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
ते सर्व आता पोलिसांनी बॅन केले आहेत. रामी रेड्डीला या कृत्यासाठी रेनिगुंटातल्या आरपीएफ पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा असतो हे त्याला माहीत नसल्याचं तो आता पोलिसांना सांगत आहे. रेल्वे पोलिसांनी रामी रेड्डी विरोधात गुन्हा नोंदवला असून, त्याला पोलीस कोठडीत पाठवलं आहे.