बु-हान वनीच्या खात्म्यानंतर दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती
By admin | Published: March 22, 2017 01:54 PM2017-03-22T13:54:58+5:302017-03-22T14:02:29+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये 2016 मध्ये कमीत-कमी 88 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला आहे. येथील 2010 नंतर दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा तरुणांचा हा सर्वात मोठाआकडा आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - जम्मू-काश्मीरमध्ये 2016 मध्ये कमीत-कमी 88 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला आहे. येथील 2010 नंतर दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा तरुणांचा हा सर्वात मोठाआकडा आहे. याबाबतची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. हिजबूल मुजाहिद्दीन या संघटनेचा कमांडर बु-हान वनी याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर काश्मीरच्या घाटीमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. यावेळी फक्त जुलै ते सप्टेंबर 2016 मध्ये दंगलीच्या 2100 हून अधिक घटना घडल्या होत्या.
गेल्या वर्षी म्हणजेच 2016 मध्ये 88 काश्मीरी तरुण दशहतवादी संघटनेत सामील झाल्याचे समोर आल्यामुळे येथील परिस्थितीत मोठा बदल होताना दिसत आहे. 2014 मध्ये दहशतवादाचा मार्ग कमी प्रमाणात तरुणांनी स्वीकारल्याचे दिसून आले होते. मात्र, गेल्या 2016 पासून घाटीमध्ये दगडफेकीच्या घटना वाढल्या. त्यानंतर त्याठिकाणी अशांतता पसरली. तसेच, दहशतवादी संघटनामधून अनेक तरुण भरती झाल्याचे उघड झाले.
दरम्यान, लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये 2015 मध्ये 66, 2014 मध्ये 53, 2013 मध्ये 16, 2012 मध्ये 21, 2011 मध्ये 23 आणि 2010 मध्ये 54 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकाराला आहे. या तरुणांना दहशतवादापासून रोखण्याचा प्रयत्न सार्वजनिक स्तरावर पोलीस करत आहेत. वेगवेगळ्या खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. याचबरोबर उड्डाण आणि हिमायत सारख्या कार्यक्रमांद्वारे तरुणांना नोकरी आणि रोजगाराचे मार्गही उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे हंसराज अहीर यांनी सांगितले.