अधिकाऱ्यांसमोर तरुणाने स्वतःला पेटवून घेतले, श्रीनगरमध्ये घडली धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 07:11 PM2022-02-22T19:11:19+5:302022-02-22T19:11:30+5:30
नाल्यावरील अवैध बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर तरुणाने पेटवून घेतले.
श्रीनगर: काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात प्रशासकीय कारवाईमुळे संतप्त झालेल्या एका तरुणाने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने अधिकाऱ्यांसमोर स्वतःला पेटवून घेतले, नंतर मदतीची याचना केली. यादरम्यान लोकांनी वेळीच आग विझवल्याने तरुणाचा जीव वाचला. या घटनेनंतर तरुणाला गंभीरावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंदरबल जिल्ह्याच्या हररान भागातील सिंध नाल्यावर गेल्या काही आठवड्यांपासून बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पाटबंधारे व पूरनियंत्रण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईला काही कब्जाधारकांनी विरोध केला.
यादरम्यान हररानचा रहिवासी असलेला नजीर अहमद शाह या तरुणाने अधिकाऱ्यांसमोर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. पेटवून घेतल्यानंतर त्याने मदतीसाठी टाहो फोडला. यावेळी पोलिसांनी आणि स्थानिक लोकांनी त्याला वाचवले. गंभीर अवस्थेत त्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.