युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 06:30 AM2020-01-26T06:30:58+5:302020-01-26T06:35:01+5:30

'आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.'

Youth should fight non-violent ways, appeals President Ram Nath Kovind | युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

Next

नवी दिल्ली : आपल्या मागण्यांसाठी लढा देताना जनतेने विशेषत: युवकांनी अहिंसक मार्गाचा अवलंब करावा. प्रत्येकाने आपली सामाजिक, आर्थिक उद्दिष्ट्ये घटनात्मक व सनदशीर मार्गांनीच साध्य करावीत, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभर झालेल्या आंदोलनाने काही ठिकाणी हिंसक वळण घेतले होते. त्याचा थेट उल्लेख न करता राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना आवाहन केले.

राष्ट्रपती म्हणाले की, महात्मा गांधी यांनी अहिंसेची देणगी साऱ्या जगाला दिली. कोणती गोष्ट योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरविण्यासाठी गांधीजींनी आचरणात आणलेले तंत्र देशातील लोकशाहीलाही लागू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या दोघांनी देशाचा विकास व जनकल्याणाला बाधा येणार नाही, अशा पद्धतीनेच राजकीय मते व्यक्त करावीत.

राष्ट्रपती म्हणाले की, स्वतंत्र लोकशाही देशात असतात ते सारे अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना दिले आहेत. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या चार तत्त्वांचे पालन करण्याची जबाबदारीही नागरिकांवर आहे. ही जबाबदारी महात्मा गांधीच्या विचारांची कास धरल्यास नीट पार पाडता येईल. देशाची अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असून ती मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत.

स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा देशातील ८ कोटी लोकांना लाभ झाला आहे. देशातील जम्मू-काश्मीर, लडाखपासून ते ईशान्य भारतातील भागांपर्यंत सर्वच ठिकाणच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. इस्रोने आजवर केलेल्या कामगिरीचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. ते म्हणाले की, गगनयान मोहिम यशस्वी करण्यासाठी इस्रो अपार मेहनत घेत आहे.

तिसरे दशक नवभारताच्या उदयाचे
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले की, २१व्या शतकातील तिसरे दशक हे नवभारताच्या उदयाचे असेल. नव्या पिढ्या देशाचे भवितव्य घडवतील. आपले युवक कोणत्याही गोष्टीआधी सर्वप्रथम देशाचा विचार करतात ही उत्तम गोष्ट आहे.

Web Title: Youth should fight non-violent ways, appeals President Ram Nath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.