जीवघेणी बेकारी; देशात दर 2 तासांत 3 बेरोजगारांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:53 PM2020-01-10T12:53:02+5:302020-01-10T12:57:29+5:30
शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्यांचं प्रमाण अधिक
नवी दिल्ली: नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१७-१८ वर्षात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या जास्त असल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड झालं आहे. २०१८ मध्ये १२ हजार ९३६ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. याच कालावधीत १० हजार ३४९ शेतकरी आणि शेतमजूरांनी मृत्यूला कवटाळलं. देशात बेरोजगारीच्या संकटानं गंभीर स्वरुप धारण केल्याचं या आकडेवारीनं अधोरेखित केलं आहे.
एनसीआरबी गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. देशात घडणारे गुन्हे, आत्महत्या, त्यांच्या मागील कारणं यांची आकडेवारी नोंदवण्याचं काम एनसीआरबी करते. २०१८ मध्ये देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण ३.६ टक्क्यांनी वाढल्याचं एनसीआरबीच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. २०१८ मध्ये देशभरात १ लाख ३४ हजार ५१६ आत्महत्या झाल्या. तर २०१७ मध्ये २९ हजार ८८७ आत्महत्या झाल्या होत्या.
देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण असल्याचं प्रतिबिंब एनसीआरबीच्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसत आहे. २०१८ मध्ये दिवसाकाठी ३५ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. तर २०१७ मध्ये दर दिवशी सरासरी ३४ जणांनी बेकारीला कंटाळून जीवनयात्रा संपवली होती. २०१६ मध्ये हाच आकडा ३० इतका होता.
२०१७ मध्ये १२ हजार २४१ बेरोजगारांनी आत्महत्या केली. तर १० हजार ६५५ शेतकरी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. २०१६ मध्ये बेरोजगारांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त होतं. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकरी आणि शेतकरी मजूरांनी आत्महत्या केली होती. याच कालावधीत नोकरी नसल्यानं आत्महत्या केलेल्यांची संख्या ११ हजार १७३ इतकी होती.