तरुणाईने नवभारत साकारावा, १८ ते २५ वयोगटाला पंतप्रधानांची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:35 AM2018-01-01T05:35:08+5:302018-01-01T05:35:26+5:30
देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.
नवी दिल्ली : देशातील तरुण पिढीने आणि खास करून १८ ते २५ या वयोगटातील नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन, त्यांच्या स्वप्नातील भारत कसा असावा, याचे विचारमंथन करावे आणि तसा नवभारत साकार करण्यासाठी हिरिरीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त केले.
‘आकाशवाणी’वरील सरत्या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी खास करून सन २००० किंवा त्यानंतर जन्मलेल्या युवापिढीशी संवाद साधला. २१व्या शतकात जन्मलेले नागरिक येत्या वर्षापासून मतदार होण्यास पात्र ठरतील. त्यामुळे उद्याचा १ जानेवारी माझ्या दृष्टीने खास दिवस आहे, असे सांगून मोदींनी या तरुणांना मतदार म्हणून नोंदणी करून घेण्याचा आग्रह केला.
मोदी म्हणाले की, लोकशाहीत मत ही सर्वात मोठी शक्ती आहे व लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे ते प्रभावी साधन आहे. युवापिढी ऊर्जा आणि संकल्पाने भारलेली आहे व या ऊर्जावान पिढीच्या कौशल्याने व ताकदीनेच नवभारताचे स्वप्न साकार होईल, याबद्दल मला खात्री आहे. हा नवभारत जातीयवाद, सांप्रदायिकता, दहशतवाद आणि भ्रष्टाचार यासारख्या विषांपासून मुक्त असावा. तेथे अस्वच्छता व गरिबीला मुळीच स्थान नसावे व त्यात सर्वांना आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची समान संधी मिळावी. शांतता, एकता व सद्भावना हेच अशा नवभारताचे सूत्र असावे.
जनआंदोलन
उभे राहावे
तरुण पिढीने केवळ नवभारताचे स्वप्नरंजन न करता, त्यासाठी पुढाकार घेऊन विचारमंथन करावे, असे आवाहन करून, मोदी यांनी १८ ते २५ वर्षांच्या युवक-युवतींनी प्रत्येक जिल्ह्यात अभिरूप संसद भरवून यावर चर्चा करावी. प्रत्येक जिल्ह्यातील एक युवा प्रतिनिधी घेऊन, १५ आॅगस्टच्या सुमारास देशपातळीवरील अशा अभिरूप संसदेचे आयोजन दिल्लीतही केले जाऊ शकेल, असेही त्यांनी सुचविले. स्वातंत्र्यासाठी जसे जन आंदोलन उभे राहिले, तसे या विचारमंथनातून विकासाचे, प्रगतीचे, सामर्थ्यवान-शक्तिशाली भारताचे जनआंदोलन उभे राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मोदी सरकार पोकळ घोषणा देणारे : गांधी
नरेंद्र मोदी सरकार हे फक्त पोकळ घोषणा देणारे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हल्ला चढवून, स्मार्ट सिटीज योजनेसाठीच्या ९,८६० कोटी रुपयांपैकी केवळ ७ टक्के निधीच सरकारने खर्च केला आहे, असे रविवारी म्हटले.