राष्ट्रध्वजाविरोधात बोलणाऱ्या महेबूबा मुफ्तींच्या पीडीपीच्या कार्यालयावर तरुणांनी फडकवला तिरंगा
By बाळकृष्ण परब | Published: October 25, 2020 04:58 AM2020-10-25T04:58:52+5:302020-10-25T06:45:30+5:30
Mahebuba Mufti News : श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याबाबत केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, श्रीनगरमध्ये पीडीपीच्या कार्यालयावर काही तरुणांनी तिरंगा फडकवला आहे. तसेच जम्मूमधील पीडीपीच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याच्या आरोपी पीडीपीच्या नेत्यांनी केला आहे.
पीडीपीचे नेते फिर्दोस तक यांनी ट्विट करून हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, पीडीपीच्या जम्मू काश्मीरमधील कार्यालयावर हल्ला करण्यात आला. काही आक्रमक राष्ट्रवादी तरुण कार्यालयात घुसले. त्यांनी माझ्यावरही हल्ला केला.
फिर्दोस पुढे म्हणाले की, जमाव आमच्या ऑफिसमध्ये घुसला. त्यांनी काही जणांना मारहाण केली. ते कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी आमच्याबाबत काही अपशब्दही उच्चारले. त्यांची ओळख पटू शकली नाही. पण ते उजव्या विचारांच्या संघटनांशी संबंधित लोक होते.
Jammu office of @jkpdp attacked just now. Few right wingers barged inside and even physically assaulted me and @ParvezWaffa.
— Firdous Tak (@takfirdous) October 24, 2020
काय म्हणाल्या होत्या महेबूमा मुफ्ती
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी वादग्रस्त विधान केले होते. आम्हाला आमचा जम्मू-काश्मीर ध्वज परत मिळेपर्यंत तिरंगा ध्वज हाती धरणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. शुक्रवारी मेहबूबा मुफ्ती यांनी श्रीनगर येथे पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा देश, दोन ध्वजांचे राजकारण पुढे केले होते. सुरुवातीला मेहबुबा म्हणाल्या की, आम्ही कलम ३७० पुन्हा आणणारच आणि असे होईपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. यासोबतच मेहबुबा यांनी भारताच्या राष्ट्रीय ध्वजाबद्दल अपमानास्पद भाष्य केले. जेव्हा आमचा जम्मू काश्मीरचा झेंडा परत येईल तेव्हाच आम्ही तो (तिरंगा) ध्वजही घेऊ. तो ध्वज आमच्या आयुष्याचा एक भाग आहे, तो आमचा ध्वज आहे. या ध्वजासोबत आमचं नातं आहे असं मेहबुबा म्हणाल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांनीही असंच वादग्रस्त विधान केले होते, काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले होते.
दरम्यान, महेबुबा यांच्या विधानावर संतप्त झालेले सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदल यांनी महेबुबा यांच्याविरूद्ध राष्ट्रीय सन्मान कायद्यासह कलम १२१, १५१, १५३ए, २९५, २९८, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. विनीत जिंदल यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबूबा मुफ्ती यांच्या वादग्रस्त विधानाने लोकांना निवडून आलेल्या सरकारविरूद्ध भडकावले आहे. तसेच देशाच्या राष्ट्र ध्वजाचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.