आलिशान बंगला, महागड्य़ा गाड्या, 24 लाख रोख; यूट्यूबरच्या घरात सापडलं लाखोंचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 03:05 PM2023-07-17T15:05:52+5:302023-07-17T15:10:59+5:30
पोलिसांनी या छाप्यात यूट्यूबरच्या घरातून तब्बल 24 लाख रुपये जप्त केले आहेत.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी एका युट्युबरच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी या छाप्यात यूट्यूबरच्या घरातून तब्बल 24 लाख रुपये जप्त केले आहेत. रोकड जप्त केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रोख रक्कम जप्त केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, युट्युबरबद्दल अशी माहिती मिळाली होती की, त्याने चुकीच्या पद्धतीने लाखोंची रोकड घरात जमा केली आहे. त्यानंतर पोलिसांनी युट्युबरच्या घरावर छापा टाकला. तस्लीम असं आरोपी यूट्यूबरचं नाव आहे. शेअर बाजाराशी संबंधित माहिती तो आपल्या चॅनलद्वारे लोकांना देतो. बरेलीतील नवाबगंजमधील मिलक पिच्छवाडा गावात पोलिसांनी छापा टाकला. तस्लीम बीटेक पास आहे. तस्लीमवर बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आणि त्याच पैशातून आलिशान घर बांधल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्याकडे आलिशान वाहनंही आहेत.
यूट्यूबर तस्लीम सांगतो की, बीटेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने ऑक्टोबर 2017 मध्ये यूट्यूबवर एक चॅनल तयार केले. युट्युबवरील एका चॅनलद्वारे तो शेअर बाजाराची माहिती देतो. त्याने चॅनलद्वारे 1.20 कोटी रुपये कमावले आहेत. यासोबतच 40 लाख रुपयांचा आयकरही जमा झाला आहे. वसूल केलेल्या 24 लाखांच्या रकमेबाबत तस्लीम सांगतो की, 24 लाखांपैकी 10 लाख त्याला लग्नात मिळाले.
सध्या आयकर पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. यूट्यूबवर तस्लीमच्या चॅनेलचे 99 हजाराहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. तस्लीमने गावात आलिशान घर बांधले आहे. तसेच त्याच्याकडे महागड्या आहे. नबाबगंजचे स्टेशन प्रभारी राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्लीमच्या घरी अवैध पैसे असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांच्या छाप्यात घरातून 24 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
तस्लीमचा भाऊ फिरोज याने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. आपल्या भावाला कटात अडकवले जात असल्याचे त्याने म्हटले आहे. फिरोजच्या म्हणण्यानुसार यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावले आहेत. फिरोजने सांगितले की यूट्यूबवर ट्रेंडिंग हब 3.0 नावाने एक चॅनेल आहे. यातून चांगले उत्पन्न मिळते. दुसरीकडे, तस्लीमचे वडील मौसम खान यांच्या म्हणण्यानुसार, मुलावर जे काही आरोप लावण्यात आले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.