YouTube Channels Banned: फेक न्यूजवर मोदी सरकारची डिजिटल स्ट्राइक, 8 यूट्यूब चॅनेल्सवर कायमची बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:45 PM2022-08-18T12:45:12+5:302022-08-18T12:47:00+5:30
चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी एका पाकिस्तानी चॅनेलसह 7 भारतीय यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली: चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी केंद्र सरकारने यूट्यूब चॅनल्सवर पुन्हा एकदा कडक कारवाई केली आहे. कथितपणे अपप्रचार करणाऱ्या 8 यूट्यूब चॅनेलवर केंद्राने बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या 8 चॅनेल्सपैकी 7 भारतीय आणि 1 चॅनल पाकिस्तानी आहे. केंद्राने या कारवाईमागे राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेबाबत अपप्रचार करणाऱ्या यूट्यूब चॅनेलवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. आयटी नियम-2021 अंतर्गत हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
Centre blocks 8 You Tube channels for spreading disinformation
— ANI Digital (@ani_digital) August 18, 2022
Read @ANI Story | https://t.co/k1QJsQLyR0#MIB#YouTubeChannels#CentreBlocksChannelspic.twitter.com/uYPZguMhq1
ज्या चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे त्यांना 144 कोटी व्ह्यूज आणि 85.73 लाख सबस्क्रायबर्स आहेत. या वाहिन्यांद्वारे भारतविरोधी खोट्या बातम्या चालवल्या जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले. यापैकी काही YouTube चॅनेल भारतातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही केंद्राने निवेदनाद्वारे म्हटले आहे. निवेदनानुसार, “भारत सरकार धार्मिक स्थळे पाडण्याचे आदेश देऊ शकते; भारत सरकार देशात धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालणार आहे. भारतात धर्मयुद्धाची सुरुवात, अशा शीर्षकांसह सामग्री अपलोड करण्यात आली,'' अशी माहिती निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका
प्रतिबंधित यूट्यूब चॅनेल भारतीय सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीरबद्दल अपप्रचार करत असल्याचेही आयटी मंत्रालयाने म्हटले. या चॅनेलवर अपलोड केलेला मजकूर पूर्णपणे खोटा आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताचे इतर देशांशी संबंध धोक्यात आले आहेत. या YouTube चॅनेलवर आयटी नियम-2000 च्या कलम 69A अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. या YouTube चॅनेलवर दर्शकांची दिशाभूल करण्यासाठी बनावट आणि खळबळजनक फोटोंचा वापर करण्यात आला, न्यूज अँकरची बनावट छायाचित्रे, काही टीव्ही न्यूज लोगोसह सामग्री अपलोड करण्यात आली.
आतापर्यंत 102 चॅनेल्सवर
जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, डिसेंबर 2021 पासून आतापर्यंत 102 यूट्यूब आधारित न्यूज-चॅनेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आयटी मंत्री अनुराग ठाकूर यांनी जुलैमध्ये लोकसभेत सांगितले की 2021-22 मध्ये 78 YouTube-आधारित न्यूज-चॅनेलवर बंदी घालण्यात आली होती. तसेच, 560 YouTube लिंक ब्लॉक करण्यात आल्या होत्या.