पॅरडी अकाउंटवरून वादग्रस्त पोस्ट, यू-ट्युबर ध्रुव राठीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 17:32 IST2024-07-13T15:04:37+5:302024-07-13T17:32:44+5:30
Dhruv Rathi News: परखड राजकीय विश्लेषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रख्यात यूट्युबर ध्रुव राठी एका वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत आला आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

पॅरडी अकाउंटवरून वादग्रस्त पोस्ट, यू-ट्युबर ध्रुव राठीविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
परखड राजकीय विश्लेषण करण्यासाठी प्रसिद्ध असलेला प्रख्यात यूट्युबर ध्रुव राठी एका वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत आला आहे. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी त्याच्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. एका फेक एक्स पोस्ट प्रकरणी ध्रुव राठीविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता ज्या एक्स अकाउंटवरून हे ट्विट करण्यात आले आहे ते ध्रुव राठी याचेच आहे का? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. दरम्यान, ध्रुव राठीच्या नावाने ज्या अकाऊंटवरून ही पोस्ट टाकण्यात आली होती. ते अकाऊंट ध्रुव राठीचं नसून त्याच्या नावाने तयार केलेलं पॅरोडी अकाऊंट होतं, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ध्रुव राठाी याच्याविरोधात हा गुन्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीविषयी लिहिलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी दाखल करण्यात आली आहे. ओम बिर्ला यांची मुलगी परीक्षा न देताचा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली, असा आरोप या पोस्टमधून करण्यात आला होता.
या प्रकरणी ओम बिर्ला यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ध्रुव राठीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून अंजली बिर्ला यांच्या यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. तसेच अंजली बिर्ला ह्या परीक्षा न देताच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता, असा आरोप बिर्ला कुटुंबीयांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासामधून ज्या अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आलं. ते अकाऊंट ध्रुव राठीच्या नावाने काढण्यात आलेलं पॅरोडी अकाऊंट असल्याचं समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी ध्रुव राठी यांची प्रतिक्रिया समोर येऊ शकलेली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ध्रुव राठी याने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच त्याने विविध मुद्द्यांवर केलेल्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता.