जगन मोहन रेड्डींना धक्का; आईचा YSR काँग्रेसला रामराम, 'या' पक्षात करणार प्रवेश...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 04:37 PM2022-07-08T16:37:09+5:302022-07-08T16:37:24+5:30
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई आणि वायएसआरसीपी नेत्या वायएस विजयम्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
आमरावती: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy)यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या आई आणि YSRCP नेत्या वायएस विजयम्मा (Y. S. Vijayamma)यांनी पक्षाच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीत वायएस विजयम्मा म्हणाल्या की, 'मी या पक्षापासून वेगळा होण्याचा विचार करत आहे.' त्यांनी आता मुलगी शर्मिला यांच्या तेलंगाणातील पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
पक्षाच्या बैठकीत विजयम्मा यांनी आता यापुढे मुलीच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले त्या म्हणाल्या की, 'शर्मिला (त्यांची मुलगी) एकटी लढत आहे. राजशेखर रेड्डी यांची पत्नी आणि शर्मिलाची आई या नात्याने मला तिच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असे माझे मन मला सांगत आहे. तो (वायएस जगन मोहन रेड्डी) अडचणीत असताना मी त्याच्यासोबत होते, आता तो इथे आनंदी आहे. माझी मुलगी (वायएस शर्मिला) एकटी लढत आहे, मी तिला साथ दिली नाही तर अन्याय होईल. मी सर्वांना विनंती करते की, मला माफ करा.' आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या आई वायएस विजयम्मा यांनी शुक्रवारी त्यांची मुलगी शर्मिला यांच्या पक्षात सामील होण्यासाठी वायएसआर काँग्रेसच्या मानद अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
शर्मिला शेजारील राज्यातील वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख आहेत. लवकरच तेलंगणात निवडणुका होणार आहेत. आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना विजयम्मा म्हणाल्या की, 'मी नेहमीच जगनच्या जवळ राहीन. पुढे जाण्यासाठी माझी मुलगी तेलंगणात एकटी लढाई लढत आहे. मला तिला साथ द्यावी लागेल. मी दोन राजकीय पक्षांची (दोन राज्यात) सदस्य होऊ शकते की, नाही या द्विधा मनस्थितीत होते. वायएसआर काँग्रेसचे मानद अध्यक्ष म्हणून राहणे माझ्यासाठी कठीण आहे. अशी परिस्थिती निर्माण होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. हे का घडले हे मला माहित नाही, परंतु मला वाटते की ही देवाची इच्छा आहे.' विशेष म्हणजे, काही काळापासून जगनमोहन रेड्डी आणि शर्मिला यांच्यात मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांवर मतभेद सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील कटुता खूप वाढली आहे.