आधी दोन्ही हात मग मान अन्... आंध्र प्रदेशात YSR नेत्याची भररस्त्यात हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 12:55 PM2024-07-18T12:55:25+5:302024-07-18T12:59:06+5:30
आंध्र प्रदेशात भररस्त्यात वायएसआर काँग्रेसच्या नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
Andhra Pradesh :आंध्र प्रदेशात राजकीय नेत्यांच्या हत्यांचे सत्र सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षातील नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता बुधवारी रात्री वायएसआर काँग्रेसच्या नेत्याची रस्त्याच्या मधोमध दोन्ही हात कापून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी हा चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाचा स्थानिक नेता अशल्याचे समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ जखमीला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाला.
माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेच्या सदस्याची आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध हत्या करण्यात आली. ही हत्येची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वायएसआर काँग्रेसच्या शेख रशीद यांच्यावर टीडीपीच्या शेख जिलानी याने धारदार शस्त्राने हल्ला केला. परस्परांमध्ये झालेल्या भांडणातून हा सगळा प्रकार घडल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जिलानीने रशीद यांचे दोन्ही हात कापले आणि नंतर त्याच्या मानेवर जीवघेणा हल्ला केला. या निर्घृण हत्येमागे वैयक्तिक वैमनस्य असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख कांची श्रीनिवास राव यांनी सांगितले. यामागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचेही श्रीनिवास राव म्हणाले. या घटनेनंतर विनकोंडा शहरात कडक बंदोबस्त लागू करण्यात आला आहे. कोणीही अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
याप्रकरणी वायएसआर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. राक्षस बनलेल्या टीडीपी नेत्याने निर्घृण हत्या केली. वायएसआरचे युवा नेते रशीद यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून मानेवरही खोल जखमा झाल्या आहेत, असे वायएसआर काँग्रेसने सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये टीडीपी नेत्यांना टॅग करत त्यांच्यावर पक्षपाताचे राजकारण केल्याचा आरोप केला.