खाण घोटाळ्यातून येडियुरप्पांची निर्दोष मुक्तता
By admin | Published: October 26, 2016 12:15 PM2016-10-26T12:15:03+5:302016-10-26T12:32:23+5:30
40 कोटींच्या खाण लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 26 - 40 कोटींच्या खाण लाचखोरी प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांची विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे आरोप झेलत असलेले भाजपाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यासोबत त्यांचे दोन मुलगे, जावई आणि जेएसडब्ल्यू अधिकाऱ्यांनाही सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. खाणकामांना परवानगी देण्यासाठी लाच स्वीकारल्याचे आरोप येडियुरप्पांवर करण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2011 मध्ये त्यांची रवानगी बंगळुरूतील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. मात्र तीन आठवड्यांमध्येच त्यांची जामीनावर मुक्तता झाली होती.
लाचखोरीच्या आरोपांविरोधात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातून येडियुरप्पांना दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर सीबीआयने येडियुरप्पा, त्यांचे दोन मुलगे बी.वाय. राघवेंद्र आणि बी.वाय. विजयेंद्र, जावई सोहन कुमार, जेएसडब्ल्यू स्टील कंपनी आणि तिच्या बेल्लारीस्थित चार कंपन्यांविरोधात लाचखोरीप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर गुन्हेगापी कट, फसवणूक, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले होते.
येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सांभाळत असताना ते आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येत असलेल्या ट्रस्टला 40 कोटी रुपये देण्यात आल्याचे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले होते. तसेच ही रक्कम जेएसडब्ल्यू स्टीलची सहयोगी कंपनी असलेल्या साऊथ वेस्ट मायनिंग कंपनीकडून देण्यात आल्याचे सीबीआयने म्हटले होते. त्याशिवाय येडियुरप्पांच्या अन्य ट्रस्टनांही कोट्यवधीची रक्क देण्यात आल्याचा उल्लेख सीबीआयने आरोपपत्रातून केला होता.