युवराज सिंगचं दिवाळीला फटाके न फोडण्याचं आवाहन, चाहत्यांनी त्याच्याच लग्नाचा फोटो टाकून दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 02:26 PM2017-10-16T14:26:06+5:302017-10-16T15:36:11+5:30
युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र काही ट्विटर युझर्सनी त्यालाच डबल स्टँडर्ड्सवरुन झापलं आहे.
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीवर दिलेला आपला निर्णय बदलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत दिल्ली आणि एनसीआर परिसरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलं असून, अनेक सेलिब्रेटिंनीही पाठिंबा दर्शवला आहे. निर्णयाचं समर्थन करणा-यांमध्ये भारतीय क्रिकेटर युवराज सिंगचाही समावेश आहे. युवराज सिंगने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.
युवराज सिंगने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत युवराज सांगतोय की, 'या दिवाळीला कृपया फटाके फोडू नका अशी मनापासून तुम्हाला विनंती आहे. गेल्या वर्षी आपल्या देशाची काय अवस्था झाली हे तुम्ही पाहिलंत. इतकं प्रदूषण झालं होतं की मला घराबाहेर पडणं मुश्किल झालं होतं. आपली मुल, वृद्द, मित्र, पालकांसाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. दिवे लावा, आनंद पसरवा, मिठ्या मारा, पत्ते खेळा पण कृपया फटाके फोडू नका. लहान मुलं मास्क लावून फिरताना पाहणं खुपच वेदनादायी असतं. आपण सर्वांनी जबाबदारी घेऊया....आपण नाही घेतली तर कोणीच घेणार नाही. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे'.
Say no to crackers, let’s celebrate a pollution free Diwali 🙏 #saynotocrackers#pollutionfreepic.twitter.com/l1sotpKizM
— yuvraj singh (@YUVSTRONG12) October 8, 2017
अनेकांनी युवराज सिंग याने प्रदूषणमुक्त दिवाळीला पाठिंबा दिल्याने कौतूक केलं आहे. मात्र यावेळी त्याच्या दुटप्पी भूमिकेवरुन अनेकांनी टार्गेटही केलं आहे. ट्विटरवर काही युझर्सनी त्याच्या लग्नातील रिसेप्शनचा फोटो शेअर करत सुनावलं आहे. या फोटोत युवराज सिंग आणि त्याची पत्नी हेजल दिसत असून त्यांच्या मागे फटाक्यांची आतिषबाजी होत असल्याचं दिसत आहे. आपल्या लग्नात फटाके फोडायचे, आणि दिवाळीला प्रदूषणमुक्त साजरी करण्याचं आवाहन करण्याचा दुटप्पीपणा करायचा असं म्हणत युझर्सनी युवराजला टार्गेट केलं आहे.
Pic 1:Yuvraj Singh Supports #FirecrackerBan on Diwali
— Ashwin Pagare (@pagareashwin) October 13, 2017
Pic 2:On his Wedding,crackers Produced Oxygen & Delhi was Pollution Free#Hypocritespic.twitter.com/CxFD0Mpmdh
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवताना फटाकेबंदीच्या निर्णयाला जातीय रंग दिला जात असल्याचं दु:ख होतयं असं म्हटलं होतं. दिवाळीनंतर प्रदूषणात काही फरक पडला का हे आम्ही पडताळून पाहणार आहोत असंही न्यायालयाने यावेळी सांगितलं होतं. महत्वाचं म्हणजे न्यायालयाने फक्त फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. ज्यांनी आधीच फटाके खरेदी केले आहेत त्यांना हा निर्णय लागू नाही. ते फटाके फोडू शकतात असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासाठी परवानगी दिली असून वेळेची अट ठेवली आहे. रात्री 6.30 ते 9.30 दरम्यान फटाके वाजवण्याची परवानगी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिली असून, आदेशाचं पालन होतंय की नाही यासाठी पीसीआर व्हॅन लक्ष ठेवणार आहे.
त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं होतं. ट्विटरच्या माध्यमातून तथागत रॉय यांनी आपली नाराजी व्यक्त करत निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने फटाकेबंदीचा दिलेला निर्णय गतवर्षी असहिष्णूता वाढल्याचा आरोप करत पुरस्कार परत करणा-या कलाकार आणि लेखकांपासून प्रभावित झाल्याचंही तथागत रॉय बोलले होते.
ट्विटरवरुन तथागत रॉय यांनी आपला संताप व्यक्त केला होता. 'कधी दहीहंडी, आज फटाके, उद्या कदाचित प्रदूषणाचा दाखला देत मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता जाळण्याविरोधात याचिका करेल', असं ट्विट करत तथागत रॉय यांनी पुरस्कार परत करणा-यांवर टीका केली.
प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीदेखील निर्णयावर नाराजी व्यक्त करत फक्त फक्त हिंदूंच्या सणांवरच कारवाई का ? असा प्रश्न विचारला होता. फटाक्यांविना मुलांसाठी दिवाळीचा अर्थ काय ? असा प्रश्न चेतन भगत यांनी विचारला. चेतन भगत यांनी एकामागोमाग एक सलग ट्विट करत आपली नाराजी जाहीर केली.