झाकीर नाईकला अटकेची भीती, वडिलांच्या अंत्यसंस्काराला येणं टाळलं
By admin | Published: October 31, 2016 10:52 AM2016-10-31T10:52:13+5:302016-10-31T10:52:13+5:30
वडिलांचं निधन झाल्यानंतरही वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईकने अटकेच्या भीतीने भारतात येणं टाळलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकचे वडील डॉ अब्दुल करीम नाईक यांच निधन झालं आहे. रविवारी सिटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतरही झाकीर नाईकने अटकेच्या भीतीने भारतात येणं टाळलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. झाकीर नाईक सध्या मलेशियात असल्याची माहिती आहे.
झाकीर नाईकच्या विरोधात नवा गुन्हा नोंद करण्यात आलेली नाही. मात्र त्याची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला (आयआरएफ) बेकायदेशीर घोषित करण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनबाबत कडक धोरण स्वीकारले असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनबाबत गृहमंत्रालयाने एक पत्रक तयार केले आहे. या पत्रकातून झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेवर कारवाई करण्याची शिफारस गृहमंत्रालयाने केली आहे.
झाकीर नाईकची भाषणेही गृहमंत्रालयाच्या रडारवर आहेत. त्याची भाषणे अत्यंत प्रक्षोभक असून, आपल्या भाषणांमधून तो विविध धार्मिक समुहांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
बांगलादेशमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी झाकीरच्या भाषणामधून प्रेरित झाल्याचा आरोप आहे. तसेच कट्टर विचारांमुळे ब्रिटन, कॅनडा, मलेशिया या देशांनी झाकीर नाईकला त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली आहे.