कर्नाटकात आढळला झिका व्हायरस, आरोग्य विभागाचा अलर्ट, जनजागृती मोहीम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 05:27 PM2023-11-02T17:27:18+5:302023-11-02T17:27:40+5:30
राज्यातील विविध ठिकाणच्या डासांमध्ये झिका व्हायरसची चाचणी करण्यात आली.
कर्नाटकात झिका व्हायरस आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. बंगळुरू शहराजवळील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात डासांमध्ये धोकादायक झिका व्हायरस आढळून आला आहे. त्यानंतर कर्नाटकआरोग्य विभाग सतर्क झाला असून याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध ठिकाणच्या डासांमध्ये झिका व्हायरसची चाचणी करण्यात आली.
चिक्काबल्लापूर जिल्ह्यातून ६ लोकांच्या चाचणी करण्यात आली होती. त्यामधील ५ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शिडलाघट्टा तालुक्यातील तलकायालाबेट्टा गावातून एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे. झिका व्हायरस आढळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
चिक्काबल्लापूरचे डीएचओ डॉ. महेश कुमार यांनी सांगितले की, १७ ऑक्टोबर रोजी डासांमध्ये झिका व्हायरस आढळला होता. मात्र, मानवी रक्ताच्या नमुन्यांमध्ये ते अद्याप आढळलेले नाही. झिका व्हायरस माणसांमध्ये झपाट्याने पसरतो. त्यासाठी मानवी रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. व्हायरसबाबत प्रशासन पूर्णपणे सतर्क असल्याचेही ते म्हणाले.
याचबरोबर, डॉ.महेश कुमार म्हणाले की, तलकायालाबेट्टाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये डासांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यासोबतच ५ गावांतील ४० महिला गर्भवती आहेत. ३० जणांची ओळख पटली असून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, तापाचे ३ रुग्ण आढळून आले असून त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, लोकांना मच्छरदाणी आणि पूर्ण कपडे घालण्याचा सल्ला डॉ. महेश कुमार यांनी दिला आहे.