नगरसेवकापाठोपाठ जि.प. सदस्यालाही अटक वैद्यकीय अधिकारी मृत्यूप्रकरण : एक दिवसाची पोलीस कोठडी
By admin | Published: February 24, 2016 12:40 AM2016-02-24T00:40:50+5:302016-02-24T00:42:58+5:30
पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्याच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी जि.प. सदस्य संजय पाटील यास पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
जळगाव : पिंपळगाव बुद्रूक, ता.भुसावळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्याच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी जि.प. सदस्य संजय पाटील यास पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.
पिंपळगाव बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त असलेले डॉ.दिनेश अमृत पाटील (२८, रा.हरेश्वरनगर, जळगाव) यांनी सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी ईश्वर भागवत पवार (रा.श्रीरामनगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जि.प. सदस्य संजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ), नितीन निवृत्ती माळी (रा.वरणगाव), अविनाश सुरेश चौधरी (रा.पिंपळगाव बुद्रूक) व सुपडू उखा पाटील (रा.पिंपळगाव बुद्रूक) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी दुपारी संजय पाटील यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारकडून ॲड.हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी नितीन माळी यास सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. त्याची कोठडी संपल्याने मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.