जि.प. तील पदांसाठी नेत्यांकडे साकडे इच्छुकांच्या भेटीगाठी : भाजपा बदल करेल, तर सेनाही करेल
By Admin | Published: October 28, 2015 10:38 PM2015-10-28T22:38:25+5:302015-10-28T23:54:45+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाल कल्याण व शिक्षण समिती सभापती या पदांसाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी आपापल्या नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली आहे.
जळगाव- जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाल कल्याण व शिक्षण समिती सभापती या पदांसाठी इच्छुक असलेल्या सदस्यांनी आपापल्या नेत्यांशी प्राथमिक चर्चा केली आहे.
यात भाजपाने आपले पदाधिकारी बदलले तर शिवसेनाही बदल करेल, असे सेनेतील मंडळींनी म्हटले आहे.
अडीच वर्षाच्या दुसर्या कार्यकाळासाठी पदाधिकारी नियुक्त करताना अनेक इच्छुक नाराज झाले होते. त्यांना सव्वा वर्षानंतर संधी देण्याचे आश्वासन नेत्यांनी दिले होते.
या आश्वासनांची आठवण आता इच्छुक आपापल्या नेत्यांना, समर्थकांनाही करून देत आहेत. अर्थातच सव्वा वर्षाचा कालावधी संपण्यात काही दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी पदांसाठी नेत्यांना साकडे घातले आहे.
अध्यक्षपदासाठी धरणगाव तालुक्यातील शोभा मालचे यांचे नाव आहे. मालचे यांच्यातर्फे पी.सी.पाटील यांनी आपल्या नेत्यांशी चर्चा केली आहे. उपाध्यक्षपदासाठी इंदिराताई पाटील या प्रमुख दावेदार आहे. इंदिराताई यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार गुलाबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे आपली भूमिका मांडणार आहे.
शिक्षण समिती सभापतीपदासाठी बोदवडमधील प्रतिभा राणे यांचे नाव पुढे आघाडीवर आहे. त्या महसूलमंत्र्यांचे समर्थक मधुकर राणे यांची पत्नी आहे. बाल कल्याण समितीसाठी मुक्ताईनगरमधील रुपाली चोपडे, धरणगावच्या छाया पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
सेनेत सर्व पदाधिकारी मिळून जि.प.तील पदांबाबत निर्णय घेतील. पदांसाठी इच्छुक असतात. चर्चेनंतर विविध पदांच्या बदलाबाबत अंतिम विषय ठरेल. अजून कुणाचे नाव पुढे आहे हे सांगता येणार नाही.
-आमदार गुलाबराव पाटील, उपनेते, शिवसेना
धरणगाव तालुक्यातील कधीही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळालेले नाही. आमच्या पक्षाचे नेते महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन व इतर वरिष्ठांकडे आमच्या तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भूमिका मांडेल.
-पी.सी.पाटील, जि.प.चे माजी सभापती