झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय त्यांच्यासाठी अन्नदाता; कॅन्सल झालेल्या ऑर्डर्सचं भुकेल्या मुलांमध्ये वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 04:17 PM2019-05-22T16:17:41+5:302019-05-22T16:19:10+5:30
लहान मुलांमध्ये रोल काकू नावानं प्रसिद्ध
कोलकाता: वर्षाच्या सुरुवातीला झोमॅटो अनेक चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिलं. ग्राहकासाठी खाद्यपदार्थ घेऊन निघालेला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय स्वत:च ते खाद्यपदार्थ खाताना दिसला. त्याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला. यामुळे सर्वच स्तरातून झोमॅटोवर टीका झाली. यानंतर कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या, पण डिलिव्हरी बॉयचं काम करावं लागणाऱ्या एका तरुणाची पोस्टदेखील व्हायरल झाली होती.
वर्षाच्या सुरुवातीला सोशल मीडियावर ट्रोल झालेलं झोमॅटो आता अनेक चांगल्या कारणांमुळे चर्चेत आलं आहे. तीन चाकांची सायकल घेऊन खाद्यपदार्थ लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला. हनी गोयल नावाच्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ सर्वप्रथम शेअर केला. यानंतर दिव्यांग व्यक्तीला नोकरी देणाऱ्या झोमॅटोचं अनेकांनी कौतुक केलं. आता पुन्हा एकदा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय चर्चेत आला आहे.
कोलकात्यातील पथिक्रित साहा त्याच्या परिसरात रोल काकू नावानं लोकप्रिय झाला आहे. झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा पथिक्रित ग्राहकांनी कॅन्सल केलेली ऑर्डर गरीब मुलांना देतो. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या अनेक भुकेल्या मुलांना आधार मिळतो. याशिवाय पथिक्रित या मुलांच्या शिक्षणासाठीदेखील मेहनत घेतो. होतकरु मुलांसाठी अभ्यास सत्रांचं आयोजन करण्याचं काम तो करतो. 'चार वर्षांपूर्वी डमडम कॅन्टोनमेंट परिसरात रस्ता ओलांडताना एक मुलगा माझ्याजवळ आला. त्यानं माझा पाय धरला आणि तो भीक मागू लागला. तो अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. तेव्हापासून मी या भागातील गरीब मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली,' असं पथिक्रितनं सांगितलं.
मुलांसाठी अभ्यास सत्रांचं आयोजन करण्यासोबतच पथिक्रितनं त्यांच्यासाठी ज्युस आणि बॉटल स्टॉलदेखील सुरू केला. मुलांना एक नियमित उत्पन्न मिळावं, यासाठी त्यानं हे पाऊल उचललं. कोलकाता महानगरपालिकेतील नोकरी सोडल्यानंतर मुलांसाठी वेळ मिळू लागला, असं त्यानं सांगितलं. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी झोमॅटोमध्ये काम करत असल्याची माहितीदेखील त्यानं दिली. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागल्यावर त्यानं डमडममधील एका रेस्टॉरंट मालकाशी मैत्री केली. आता ती व्यक्तीदेखील पथिक्रितला मदत करते. त्यामुळे ग्राहकांनी कॅन्सल केलेल्या सर्व ऑर्डर गरीब घरातील लहान मुलांना देणं शक्य होतं.