आता घरबसल्या मागवू शकता Street Food, सरकारनं Zomato सोबत केला करार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 07:21 PM2021-02-05T19:21:11+5:302021-02-05T19:26:00+5:30
PM SVANIDHI Scheme अंतर्गत सरकारनं Zomato सोबत केला करार
PM SVANIDHI Scheme : केंद्र सरकारनं रस्त्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या लोकांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे बाजार उपलब्ध करून देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयानं पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे बाजार उपलब्ध करून देण्यासाठी झोमॅटोसोबत करार केला आहे. गुरुवारी झोमॅटोनं यासदंर्भातील करार केला. सरकारनं यापूर्वी स्विगीशीही करार केला होता.
सुरूवातीला ६ शहरांच्या ३०० खाद्यपदार्ख विक्रेत्यांना झोमॅटोसोबत प्रशिक्षण दिलं जाईल. यामध्ये भोपाळ, रायपूर, पाटणा, बडोदा, नागपूर आणि लुधियाना या शहरांचा समावेश आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर झोमॅटो या योजनेचा १२५ शहरांमध्ये विस्तार करेल आणि त्यानंतर १२५ शहरांमधील खाद्यपदार्ख विक्रेत्यांसोबत काम सुरू करेल. पंतप्रधान स्वनिधी याजनेअंतर्गत झोमॅटोनं सरकारसोबत करार केला आहे. याअंतर्गत झोमॅटो रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना पॅन कार्ड तयार करण्यापासून एफएसएसएआय नोंदणी, फूड मेन्यू डिजिटाईझ करणं, वेंडर सेफ्टी आणि हायजिनसाठी प्रशिक्षण देणं आणि पदार्थांच्या किंमती ठकवणं यावर स्वत: काम करणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये सरकारं स्विगीसोबतही करार केला होता.
नवे ग्राहक मिळणार
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. अशातच झोमॅटो आणि स्विगीवर त्यांच्या खाद्यपदार्थांची विक्री झाल्यास त्यांनाही मदत मिळणार आहे. त्यामुळे रस्त्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना नवे ग्राहकही मिळतील आणि लोकांना घरबसल्या खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येईल.