Corona Vaccination: तिसऱ्या लाटेआधी कोरोनावर तीन वार करण्याची तयारी; लहान मुलांच्या लसीकरणाचा मेगाप्लान पूर्ण?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 09:56 AM2021-06-28T09:56:51+5:302021-06-28T09:58:46+5:30
Corona Vaccination: लवकरच लहान मुलांसाठीच्या लसीकरणासाठी तीन लसींना परवानगी मिळण्याची शक्यता
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन, फायझर आणि झायडस कॅडिला या तीन लसींना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यका आहे. त्यानंतर लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल.
कोरोनाची लाट रोखायची असल्यास लसीकरण हा सर्वोत्तम उपाय आहे. गेल्या काही दिवसांत लसीकरण मोहिमेनं वेग घेतला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तवली जात असल्यानं आता लहान मुलांसाठीच्या लसीकरणावर विशेष लक्ष दिलं जात आहे. 'झायडस कॅडिलाच्या लसीच्या चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टपासून आपण १२ ते १८ वर्षांच्या मुलांचं लसीकरण सुरू करू शकतो,' अशी माहिती कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली.
लहान मुलांसाठी लवकरच तीन लसी उपलब्ध होणार?
- भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचे निष्कर्ष सप्टेंबरपर्यंत येऊ शकतात. यानंतर औषध नियामकांची परवानगी येताच त्यानंतर लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल.
- कोवॅक्सिनची आधी फायझरच्या लसीला मंजुरी मिळू शकते. तसं झाल्यास आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.
- एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, झायडस कॅडिला लवकरच भारतीय औषध नियामक संस्थेकडून लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करू शकते. ही लस वयस्कर आणि लहान मुलं अशा दोघांनाही दिली जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.