विमानतळबाधितांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:05 AM2017-10-17T07:05:44+5:302017-10-17T15:55:31+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांसाठी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची घोषणा सिडकोने केली होती, परंतु प्रभावी अंमलबाजवणीअभावी ही घोषणा कागदावरच राहिली आहे.
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांसाठी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याची घोषणा सिडकोने केली होती, परंतु प्रभावी अंमलबाजवणीअभावी ही घोषणा कागदावरच राहिली आहे. त्यामुळे विमानतळबाधितांना आवश्यक माहिती मिळविण्यासाठी सिडको कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत.
आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यापैकी बारा महसुली गावातील ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित जमिनीचा मोबदला म्हणून संबंधित प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात आले आहेत. नव्याने विकसित होणा-या पुष्पकनगरमध्ये हे भूखंड वाटप करण्यात आले आहेत. विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात महत्त्वाचा अडथळा असलेल्या दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्थलांतरित गावांना वडघर आणि फुंडे वाहळ येथे पर्यायी भूखंड देण्यात आले आहे. एकूणच भूसंपादन आणि पुनर्वसन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा हा संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने सिडकोने विमानतळबाधितांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्याची घोषणा केली होती. या संकेतस्थळावर प्रकल्पग्रस्तांच्या संपादित जमिनीचा तपशील, त्यांना देण्यात आलेला पर्यायी भूखंड, अॅवॉर्ड तसेच इतर तपशील उपलब्ध करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. सिडकोच्या या भूमिकेचे विमानतळबाधितांनी स्वागत केले होते. अशाप्रकारचे संकेतस्थळ उपलब्ध झाल्यास भूसंपादन आणि पुनर्वसनाबाबतची आवश्यक माहिती मिळविणे सहज सोपे होईल, असा आशावाद प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला होता. परंतु तीन वर्षे उलटून गेले तरी अशाप्रकारचे कोणतेही संकेतस्थळ तयार करण्यात आलेले नाही. अन्य आश्वासनाप्रमाणे स्वतंत्र संकेतस्थळाची घोषणाही कागदावरच सीमित राहिल्याने प्रकल्पग्रस्तांची पुरती निराशा झाली आहे.