"मारा ***"; दंगल रोखण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन उतरले अतिरिक्त पोलीस महासंचालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 03:49 PM2024-10-14T15:49:18+5:302024-10-14T15:56:29+5:30

उत्तर प्रदेशच्या बहराइचमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bahraich Violence ADG Law and Order Amitabh Yash came on the road with a pistol | "मारा ***"; दंगल रोखण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन उतरले अतिरिक्त पोलीस महासंचालक

"मारा ***"; दंगल रोखण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन उतरले अतिरिक्त पोलीस महासंचालक

Bahraich Violence : उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये झालेल्या हिंसाचारामध्ये दोन जणांच्या हत्येनंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. शेकडो आंदोलकांनी गाड्या आणि दुकानांना आग लावली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  पोलीस दलाच्या विशेष सहा तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. यासोबतच इंटरनेटही बंद करण्यात आले आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली जाणार नाही. दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली जात असल्याचे समोर आलं आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अमिताभ यश यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अमिताभ यश यांनी पिस्तुल हवेत उंचावून आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

बहराइचमधील मन्सूर गावातील महाराजगंज परिसरात दुर्गा मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या हिंसाचारात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असून दगडफेकीत सुमारे अर्धा डझन लोक जखमी झाले आहेत. बहराइचमध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. लखनऊहून गृह विभागाचे सचिव संजीव गुप्ता यांच्यासह एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यशही बहराइचला पोहोचले आहेत. अमिताश यश यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात ते हातात पिस्तूल घेऊन संतप्त जमावावर कारवाई करण्याबाबत बोलताना दिसत आहे. अमिताभ यश पिस्तुल हातात घेऊन जमावाचा पाठलाग करताना दिसत आहेत.

एडीजी अमिताभ यश यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दंगलखोरांना पळवून लावणाऱ्या पोलिसांच्या मध्ये अचानक आलेल्या अमिताभ यांनी एका हातात पिस्तुल घेऊन पोलिसांनी कारवाई करण्याची सूचना केली. एका हातात मोबाईल आणि चष्मा आणि दुसऱ्या हातात पिस्तूल धरून अमिताभ यश हे पोलिसांना यांना मारा असे म्हणताना दिसत आहे. परिस्थिती बिघडल्यापासून पोलीस दल रस्त्यावर उतरले असून दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे इंटरनेट सेवेवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, बहराइचमध्ये रविवारी झालेल्या जातीय हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले आहे. बहराइचच्या पोलिस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, महसी तहसील अंतर्गत महाराजगंज भागात तणावाचे वातावरण आहे. मिरवणूक मुस्लिमबहुल भागातून जात असताना दुसऱ्या समुदायातील व्यक्तीवर कथित हल्ला करण्यात आला, यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे ३० जणांना ताब्यात घेतले आहे. दंगलग्रस्त भागात सामान्य स्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

रविवारी मूर्ती विसर्जनाच्या वेळी महाराजगंज मार्केटमधील मशिदीजवळ झालेली दगडफेक, त्यानंतर मारामारी आणि त्यानंतर राम गोपाल मिश्रा नावाच्या मुलाचा मृत्यू झाल्यापासून हिंसाचार थांबलेला नाही. सोमवारी सकाळी महाराजगंज परिसरात लोकांनी पुन्हा गोंधळ घातला. आरोपींना अटक करण्याची मागणी करत जमावाने अनेक ठिकाणी जाळपोळ केली. दंगलखोरांनी हिरो मोटरसायकलच्या शोरूमजवळील एका ठिकाणी दुचाकी, कार आणि दुकान पेटवून दिले.
 

Web Title: Bahraich Violence ADG Law and Order Amitabh Yash came on the road with a pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.