५००व्या कसोटीतील १० ऐतिहासिक क्षण
By Admin | Published: September 26, 2016 05:31 PM2016-09-26T17:31:52+5:302016-09-26T17:31:52+5:30
भारताची ही ५०० वी कसोटी! कसोटी क्रिकेटची सुरुवात भारतीय संघाने १९३२ साली केली. २२ सप्टेंबर २०१६ रोजी ५०० वा सामना खेळणारा भारतीय संघ जगातील चौथा देश ठरला
नामदेव कुंभार / ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 16 - ऐतिहासिक ५००व्या कसोटीत भारताने न्युझीलंडवर १९७ धावांनी दणदणित विजय मिळवला. भारतातर्फे आर. अश्विन आणि जडेजाने उत्कृष्ट फिरकीसमोर न्युझीलंडचे फलंदाज ढेपाळले. भारताने पहिली कसोटी जिंकत ३ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. ऐतिहासिक ५००व्या कसोटीत अश्वनने 10 आणि जडेजाने 6 बळी मिळविले. दोन्ही डावामधील फलंदाजी (९२ धावा) व ६ विकेट्ससाठी रविंद्र जाडेजाला ' सामनावीरा'चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कसोटीनंतर अनेक विक्रम झाले. जाणून घेऊयात 500 कसोटीनंतर झालेले विक्रम आणि काही महत्वपुर्ण घटना.
- भारताची ही ५०० वी कसोटी! कसोटी क्रिकेटची सुरुवात भारतीय संघाने १९३२ साली केली. २२ सप्टेंबर २०१६ रोजी ५०० वा सामना खेळणारा भारतीय संघ जगातील चौथा देश ठरला आहे..
- एकूण 500 कसोटी सामन्यातील भारताचा हा 130 विजय आहे. विशेष म्हणजे 300, 400 आणि आता 500 व्या कसोटी सामन्यात भारत अजिंक्य राहीला आहे.
- 500 कसोटी सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी तीन खेळीत 100 हून धावांसाठी भागिदारी झाली. पाहिल्या खेळीत भारताच्या मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी 112 धावांची भागिदारी केली. यानंतर दुसऱ्या खेळीत न्यूझीलंडच्या टॉम लेथम आणि विलियमसन यांच्या 124 धावांची भागिदारी झाली. यानंतर पुन्हा भारतीय संघाने फलंदाजीस सुरुवात केल्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा या जोडगोळीने 133 धावांची भागिदारी करत विक्रम रचला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 44 वर्षानंतर पुन्हा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. यापुर्वी दोन कसोटी सामन्यात हा विक्रम रचला गेला होता. 1953 मध्ये लॉर्डसवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया तर 1972-73दरम्यान एमसीजी मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानदरम्यान असा विक्रम झाला होता.
- कानपूरच्या ऐतिहासिक कसोटीत भारतीय संघाने न्यूझीलंडचा 197 धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे भारताने कसोटीच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठलं आहे. भारत आणि पाकिस्तानच्या खात्यात आता प्रत्येकी 111 गुण जमा झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळालं होतं. मात्र भारताच्या आजच्या विजयामुळे पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला आयसीसीने दिलेली प्रतिष्ठित गदा अवघ्या सहा दिवसातच परत घेतली जाणार आहे.
- ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने कारकिर्दीतील ३७ व्या कसोटी सामन्यात रविवारी चौथ्या दिवशी किवी कर्णधार केन विलियम्सनला बाद करतं कसोटी कारकिर्दीतील २०० वा बळी घेतला. सर्वांत कमी सामन्यांत असा पराक्रम करणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेटने ३६ कसोटी सामन्यात २०० बळी घेतले आहेत. अश्विनने डेनिस लिली व वकार युनिस यांना पिछाडीवर सोडले. त्यांनी ३८ कसोटी सामन्यांत बळींचे द्विशतक नोंदवले होते. भारतातर्फे ऑफ स्पिनर हरभजन सिंगने ४६ सामन्यांत २०० बळी पूर्ण केले होते. अनिल कुंबळेने ४७, भगवत चंद्रशेखरने ४८ तर कपिल देवने ५० सामन्यांत २०० बळींचा टप्पा गाठला.
- शानदार फॉर्ममध्ये असलेला आणि स्वत:च्या नेतृत्वात सलग तीन मालिका जिंकणारा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका जिंकल्यास देशातील दिग्गज कर्णधारांना मागे टाकू शकेल. 500वी कसोटी मालिका विजयासह वैयक्तिकदृष्टया 15 व्या कसोटी सामन्यात विराटने 8 विजय संपादन करुन माजी कर्णधार राहूल द्रविड (७) चा विक्रम मोडीत काढला आहे. सर्वाधिक कसोटी विजय मिळविणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट सध्या सहाव्या स्थानावर आहे. या मालिकेत क्लीन स्वीप झाल्यास नवाब पतौडी(९ विजय) आणि सुनील गावस्कर(९ विजय) यांना मागे टाकून विराट चौथ्या स्थानावर येईल.
- न्यूझीलंडविरुद्ध विराटने मालिका जिंकून दिल्यास भारताचा मालिका विजयाचा चौकार ठरेल. विराटने श्रीलंका दौऱ्यात २२ वर्षानंतर २-१ ने विजय मिळवून दिला. द. आफ्रिकेवर स्थानिक मालिकेत ३-० ने आणि त्यानंतर विंडीजमध्ये २-० असा विजय मिळवला आहे.
- न्यूझीलंडने भारतात ३२ कसोटी सामने खेळले. केवळ दोन सामने जिंकले. भारतात १९८८ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांनी अखेरचा विजय नोंदविला. त्यानंतर भारतात खेळल्या गेलेल्या १५ कसोटींपैकी सात सामने भारताने जिंकले. आठ सामने अनिर्णीत राहिले. भारत-न्यूझीलंड संघात झालेल्या अखेरच्या चारही कसोटींत भारताने विजय नोंदविला आहे.
- न्यूझीलंडचा ऑफस्पिनर मार्क क्रेगने स्नायूंच्या दुखापतीमुळं उर्वरित कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी गोलंदाजी करत असताना मार्क क्रेगची दुखापत बळावली. त्यामुळं त्याला सामना अर्धवट सोडावा लागला होता.
- रवींद्र जाडेजा मॅन ऑफ दी मॅच
अष्टपैलू रवींद्र जाडेजा कानपूर कसोटीत भारताच्या विजयाचा नायक ठरला. जाडेजानं 44 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी केली होती. त्यामुळंच भारताला पहिल्या डावात सर्वबाद 318 धावांची मजल मारता आली. दुसऱ्या डावातही जाडेजानं नाबाद 50 धावा फटकावल्या होत्या. जाडेजानं पहिल्या डावात पाच विकेट्स काढून न्यूझीलंडला सर्वबाद 262 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाडेजानं दुसऱ्या डावात ल्यूक रॉन्की आणि मिचेल सॅन्टनर ही जोडी फोडून भारताला महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिला.