अँटिग्वा कसोटीनंतर झालेले १० विक्रम
By Admin | Published: July 25, 2016 05:07 PM2016-07-25T17:07:57+5:302016-07-25T17:12:22+5:30
विराट कोहली हा दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज ठरला. यासरखेच या कसोटी सामन्यानंतर अनेक विक्रम झाले. त्यापैकी काही विक्रम आपण जाणून घेऊ...
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ : आर अश्विनची अष्टपैलू खेळी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाच्या बळावर भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध धडाकेबाज विजय मिळवला. ४ कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. पहिला कोसोटी सामना भारताने चौथ्या दिवशीच जिंकत विराट विजय मिळवला. या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजला फॉलो ऑन दिला. वेस्ट इंडिजवर घरच्या मैदानात फॉलो ऑनची नामुष्की ओढवण्याची ही आठवी वेळ ठरली. विराट कोहलीचे द्विशतक आणि अश्विनची फिरकी या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. तर कॅरेबियन भूमीत द्विशतक फटकावणारा विराट कोहली हा दिलीप सरदेसाई, सुनील गावसकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि वासिम जाफर यांच्यानंतरचा पाचवा फलंदाज ठरला. यासरखेच या कसोटी सामन्यानंतर अनेक विक्रम झाले. त्यापैकी काही विक्रम आपण जाणून घेऊ...
- वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या अँटिग्वा कसोटीत विराटने २८३ चेंडूत २०० धावांची खेळी केली. त्याबरोबरच परदेशी भूमीवर द्विशतकी खेळी करणारा विराट भारताचा पहिला कर्णधार ठरला आहे. तसेच गेल्या दहा वर्षात भारतीय उपखंडाबाहेर द्विशतक फटकावणारा विराट हा पहिला फलंदाज ठरलाय. यापुर्वी, २००६मध्ये वासीम जाफरने वेस्ट इंडिज दौ-यातच द्विशतकी खेळी केली होती. (भारताचा 'विराट' विजय, अश्विनची अष्टपैलू खेळी)
- भारताने एक डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला. भारताचा भारतीय उपखंडाबाहेरचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी सप्टेंबर २००५ मध्ये भारताने झिम्बाब्वेवर एक डाव आणि ९० धावांनी विजय मिळवला होता.
- सामनावीर रविचंद्रन अश्विनने एकाच कसोटीत शतक आणि डावात पाच बळी टिपण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा केला. याआधी नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्याने अशी कामगिरी केली होती.
- अश्विनने दुसऱ्या डावात ८३ धावा देत ७ बळी टिपले. त्याची भारताबाहेरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच भारतीय उपखंडाबाहेर त्याने पहिल्यांदाच पाच बळी टिपले.
- भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने पहिल्या डावात यष्टीमागे सहा फलंदाजांची शिकार केली. त्याबरोबरच त्याने एका डावात यष्टीमागे सर्वाधिक सहा शिकार करण्याच्या सय्यद किरमानी आणि महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
- भारताविरुद्धच्या गेल्या १६ कसोटीतील वेस्ट इंडिजचा हा नववा पराभव. भारताने २००२ साली केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पाचव्या कसोटीत वेस्ट इंडिजने भारतीय संघाला पराभूत केले होते. त्यानंतर कसोटी सामन्यात भारताला हरवणे वेस्ट इंडिजला शक्य झालेले नाही.
- अनिल कुंबळेने प्रशिक्षक पदाची धुरा संभाळल्यानंतर पहिल्याच कसोटीत भारताचा विजय.
- ४९६ कसोटीतील भारताचा १२८ वा विजय, तर वेस्ट इंडिजचा ५१४ कसोटीतील १७८ वा पराभव
- भारताचा वेस्ट इंडिज वरील १७वा विजय, तर वेस्ट इंडिजमधील सहावा विजय.
- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ११व्या कसोटीतील भारताचा हा सहावा विजय.