101 वर्षाच्या भारतीय महिलेने धावण्याच्या शर्यतीत जिंकले सुवर्णपदक
By admin | Published: April 24, 2017 02:18 PM2017-04-24T14:18:13+5:302017-04-24T14:32:01+5:30
एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर, वयाचा मुद्दा कधीही आड येत नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
ऑकलंड, दि. 24 - एखादे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर, वयाचा मुद्दा कधीही आड येत नाही. 101 वर्षाच्या मन कौर यांनी इतरांसाठी अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड येथे सुरु असलेल्या वर्ल्ड मास्टर्स गेम्समध्ये सोमवारी मन कौर यांनी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. कौर यांनी 1 मिनिट 14 सेकंदात हे अंतर पार केले.
कौर यांच्या सुवर्णपदकाचे वैशिष्टय म्हणजे वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी करुन दाखवली. वयाच्या शंभरीपर्यंत पोहोचलेल्या किंवा शंभरी पार करणा-या व्यक्ती अपवादात्मक असतात. वयाची सत्तरी पार केल्यानंतरच अनेकजण थकून जातात. त्यांना चालणेही जमत नाही. अशा वयात धावण्याच्या शर्यतीत मनकौर यांनी सुवर्णपदक मिळवले.
100 वर्ष वयोगटात कौर एकटया स्पर्धक होत्या. त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच होता. पण या वयात धावणे ही साधी गोष्ट नाही. न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत 25 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. मी स्पर्धेत सहभागी होऊन धावण्याचा आनंद घेतला. मी धावणे थांबवणार नाही. यापुढच्या स्पर्धांमध्ये मी सहभागी होईन. आठ वर्षांपूर्वी 93 वर्षाच्या असताना मुलाच्या सल्ल्याने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये धावायला सुरुवात केली.