राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:29 PM2024-10-22T13:29:53+5:302024-10-22T13:32:31+5:30
Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ ची तारीख जाहीर झाली.
Commonwealth Games 2026 News In Marathi : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. मात्र, या नामांकित स्पर्धेतून क्रिकेट, हॉकीसह तब्बल तेरा खेळ वगळण्यात आले आहेत. भारताचे वर्चस्व असलेले प्रमुख खेळ आगामी स्पर्धेत नसल्याने भारताला मोठा झटका बसला आहे. खरे तर ही स्पर्धा नक्की कुठे खेळवली जाणार याची मागील काळात बरीच चर्चा रंगली होती. अखेर स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धा खेळवली जाईल हे निश्चित झाले. २३ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा पार पडेल. आर्थिक कारणांमुळे ऑस्ट्रेलियाने यजमानपद नाकारले होते.
हॉकी, क्रिकेट, कुस्ती, शूटिंग आणि बॅडमिंटन हे खेळ आगामी स्पर्धेत नसतील. नियोजित वेळापत्रकानुसार ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियात ही स्पर्धा होणार होती. मात्र, व्हिक्टोरियाने यजमानपद न स्वीकारल्याने काही खेळ वगळण्यात आले. त्यामुळे भारतीय चाहते आता थेट आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिकच्या प्रतीक्षेत असतील असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. आगामी स्पर्धेतून एकूण १३ खेळ वगळले असून, यामध्ये भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीचादेखील समावेश आहे. तसेच हॉकी, रग्बी सेवन, डायविंग, बॅडमिंटन, बीच वॉलीबॉल, रोड सायकलिंग, माउंटेनबाइकिंग, रिदमिग जिमनास्टिक, स्क्वॅश, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, कुस्ती आदी खेळ वगळण्यात आले आहेत.
भारताच्या मेडल आशांना धक्का
राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नेहमीच भारतीय शिलेदारांनी चमक दाखवली आहे. हॉकी, क्रिकेट, कुस्ती आणि बॅडमिंटनसारख्या खेळांनी भारताच्या पदकांची झोळी भरण्यात मोठे योगदान दिले. पण, २०२६ च्या स्पर्धेतून या खेळांना वगळल्याने भारताच्या आशा मावळल्याचे दिसते. भारताचा पुरुष आणि महिला हॉकी संघ पदकाचा प्रबळ दावेदार असतो. मागील स्पर्धेत पुरुष संघाने रौप्य पदकाची कमाई केली होती. तर बॅटमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने पदके जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये क्रिकेटने पदार्पण केले. पदार्पणाच्या हंगामातच भारताच्या महिला क्रिकेट संघाने रौप्य पदक जिंकले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सुरुवातीला व्हिक्टोरियाला २०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे अधिकार देण्यात आले होते. पण, आर्थिक कारणामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. स्पर्धेचे बजेट वाढल्याने तेथील सरकारला माघार घ्यावी लागली. स्कॉटलंडने २०१४ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले होते. कमी खर्चात स्पर्धा पार पडावी या उद्देशाने त्यांनी २०२६ च्या स्पर्धेतून काही प्रमुख खेळ वगळले. विशेष बाब म्हणजे सुधारित आवृत्तीमध्ये फक्त १० खेळांचा समावेश असेल. यामध्ये ॲथलेटिक्स, पोहणे, बॉक्सिंग आणि सायकलिंगचा समावेश आहे. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांचे लक्ष आशियाई खेळ आणि ऑलिम्पिकसारख्या इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे वळू शकते.